क्रिकेटमधील रोमांच अधिकाधिक वाढवण्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाचा सातत्याने वापर केला जात असतो. डीआरएस, बॉल ट्रॅकर, अल्ट्राएज, एलईडी स्टम्प्स यासारख्या गोष्टींमुळे निर्णयामधील अचुकता वाढली आहे. दरम्यान, आता क्रिकेटच्या मैदानात इलेक्ट्रा स्टम्प्सचा प्रवेश झाला आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या बिग बॅश लीगच्या हंगामात इलेक्ट्रा स्टम्प्सचं अनावरण करण्यात आलं आहे. बिग बॅश लीगमध्ये हे स्टम्प्स क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. आता हे स्टम्प्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरले जाणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. सध्यातरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ एलईडी लाइट असलेले स्टम्प्स वापरले जातात.
इलेक्ट्रा स्टम्प्सचा उपयोग हा महिलांच्या बिग बॅश लीगमध्ये करण्यात आला होता. आता त्यांचा वापर बिग बॅश लीगमध्ये अॅडिलेड स्ट्रायकर्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात झालेल्या सामन्यात करण्यात आला. याबाबत ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू मार्क वॉ यांनी सांगितले की, हे रंगीत स्टम्प्स फॅन्स आणि क्रिकेटपटूंसाठी एक प्रकारचं ख्रिसमस गिफ्ट आहेत.इलेक्ट्रा स्टम्प्सच्या वापराला झालेल्या सुरुवातीकडे क्रिकेटमधील एक मोठी सुरुवात म्हणून पाहिले जात आहे. या स्टम्प्समध्ये पाच वेगवेगळे रंग आहेत. सामन्यादरम्यान वेगवेगळ्या निर्णयांवेळी यात वेगवेगळे रंग दिसतील. हे रंग बाद झाल्यावर, चौकार किंवा षटकार, नोबॉल आणि षटकांमधील बदलांचे संकेत देतील.
उदाहरण म्हणून, जेव्हा कुठलीही विकेट पडेल, तेव्हा तीन स्टम्प्स लाल होतील. तसेच त्यात आग पेटल्यासारखे दिसेल. यादरम्यान, जेव्हा नोबॉल असेल, तेव्हा स्टम्पवर लाल आणि पांढरा रंग स्क्रोल होताना दिसेल. एक षटक पूर्ण झाल्यावर स्टम्प्स निळे आणि जांभळे दिसतील.
चौकार मारला तर स्टम्प्समधून वेगवेगळ्या रंगाचा फ्लॅश बाहेर येईल. तर षटकार मारल्यावर रंग स्क्रोल होतील. एकूणच हे स्टम्प्स क्रिकेटमधील रंगरूप बदलणार आहेत. तसेच एकप्रकारे पंचांचं कामही करणार आहेत. आता बिग बॅशमध्ये वापरण्यात येत असलेले स्टम्स आयपीएलमध्येही पाहता येतील का? असा प्रश्न विचारला जात आहे. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या एलईडी लाइटवाले स्टम्प्स वापरले जात आहेत.