जोहान्सबर्ग : सलामीवीर फलंदाज डीन एल्गरने दक्षिण आफ्रिकेचे कसोटी कर्णधारपद स्वीकारण्यासाठी उत्सुकता दाखविली आणि कर्णधारपदाचे दडपण येणार नसून जर माझ्याकडे कर्णधारपदाचा प्रस्ताव आला तर मी त्याचा गांभीर्याने विचार करेन, असे त्याने म्हटले आहे.
फाफ ड्यूप्लेसिसने फेब्रुवारीमध्ये कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता आणि क्विंटन डिकॉक ही जबाबदारी सांभाळेल, अशी आशा होती, पण क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने (सीएसए) आम्ही आपल्या यष्टिरक्षक फलंदाजावर कर्णधारपदाचे ओझे लादू इच्छित नसल्याचे सांगत त्याला या शर्यतीतून वगळले. जुलैमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे आहे आणि सीएसए अद्याप कसोटी कर्णधारपदासाठी खेळाडूचा शोध घेत आहे.
एल्गरने सीएसएला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले,‘कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी निश्चितच सोपी नाही, पण माझ्यात नेतृत्व करण्याची क्षमता आहे. मी यापूर्वीही नेतृत्व केलेले आहे. शालेय, प्रांतीय व फ्रँचायझी संघांचे नेतृत्व केलेले आहे. मी त्याचा आनंद घेतला आहे. माझ्याकडे कर्णधारपदाबाबत विचारणा करण्यात आली तर मी निश्चितच याचा गांभीर्याने विचार करेन. कारण ते माझ्यासाठी महत्त्वाचे असेल..’ (वृत्तसंस्था)