Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात आज एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) असा सामना रंगत आहे. SRHनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवला. RCBचे चार फलंदाज ६२ धावांतच तंबूत परतल्यानं कर्णधार विराट कोहलीचा चेहरा पडला.
आरोन फिंच संघात असतानाही विराट कोहलीनं RCBसाठी देवदत्त पडीक्कलसह सलामीला येण्याचा निर्णय घेतला. त्याला बाद करण्यासाठी डेव्हिड वॉर्नरनं पहिले षटक संदीप शर्माच्या हाती सोपवलं. संदीपनं IPLमध्ये सर्वाधिक ७ वेळा विराटला बाद केले आहे. विराटही आज त्याचा अभ्यास करून आला होता.पण, विराटसाठी जेसन होल्डरचा पेपर अवघड ठरला. होल्डरनं दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विराटला ( ६) बाद केले. वाईड जाणाऱ्या चेंडूला छेडणं विराटला महागात पडलं. त्यापाठोपाठ पुढच्याच षटकात होल्डरनं SRHला दुसरं यश मिळवून दिलं. त्यानं पडीक्कलला ( १) प्रियान गर्गकरवी झेलबाद केलं.
१५ धावांत दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर एबी डिव्हिलियर्स आणि फिंच यांनी सावध पवित्राच घेतला. ९व्या षटकापर्यंत या दोघांनी सावध खेळ करताना संघाला २ बाद ४६ धावांपर्यंत नेलं. त्यानंतर राशिद खानला टार्गेट करताना फिंचनं फटकेबाजीला सुरुवात केली. फिंचनं खणखणीत षटकार खेचून एका विक्रमाची नोंद केली. आयपीएलमध्ये २००० धावा करणारा तो ऑस्ट्रेलियाचा सहावा फलंदाज ठरला. या विक्रमात डेव्हिड वॉर्नर ( ५२३५), शेन वॉटसन ( ३८७४), शॉन मार्श ( २४७७), स्टीव्ह स्मिथ (२३३३), अॅडम गिलख्रिस्ट ( २०६९) हे आघाडीवर आहेत. फिंचला हा आक्रमकपणा रूचला नाही. शाहबाद नदीमनं त्याला ११व्या षटकात ३२ धावांवर झेलबाद केले.
एक अतिरिक्त फलंदाज म्हणून संघात स्थान मिळालेल्या मोईन अलीला पहिल्याच चेंडूवर माघारी परतावे लागले. नदीमनं टाकलेल्या नो बॉलवर एबीनं १ धाव घेतली. त्यानंतर अलीच्या वाट्याला फ्री हिटचा चेंडू आला अन् त्याच चेंडूवर तो बाद झाला. राशिद खाननं अचून थ्रो करताना त्याला धावबाद केलं..
पाहा व्हिडीओ...