emerging asia cup 2023 । कोलंबो : इमर्जिंग आशिया चषकामध्ये आज कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने होते. नेपाळला चीतपट करून उपांत्य फेरीत स्थान मिळवणाऱ्या भारतीय संघाने या सामन्यात देखील चमकदार कामगिरी केली आणि विजयाची हॅटट्रिक लगावली. राजवर्धन हंगर्गेकरने ५ बळी घेत पाकिस्तानची पळता भुई थोडी केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानी संघाने ४८ षटकांत सर्वबाद २०५ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा सहज पाठलाग करत भारताने विजय नोंदवला. साई सुदर्शनने १०४ धावांची नाबाद शतकी खेळी करून शेजाऱ्यांना पराभवाची धूळ चारली.
पाकिस्तानने दिलेल्या २०६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला अभिषेक शर्माच्या (२०) रूपात पहिला झटका बसला. पण साई सुदर्शन पाकिस्तानी संघासाठी काळ ठरला आणि त्याने नाबाद शतक झळकावले. भारताकडून सलामीवीर साई सुदर्शनने सर्वाधिक १०४ धावांची नाबाद खेळी केली तर निकिन जोस (५३) धावा करून बाद झाला. ३ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने भारतावर 'साई'कृपा अन् पाकिस्तानचा पराभव झाला. भारताने ३६.४ षटकांत २ बाद २१० धावा करून ८ गडी राखून विजय साकारला.
राजवर्धनसमोर पाकिस्तानी संघ गारद पाकिस्तानकडून कासिम अक्रम (४८) वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारताकडून राजवर्धन हंगर्गेकरने सर्वाधिक पाच बळी घेतले. तर मानव जगदुसाकुमार सुथार (३) आणि रियान पराग आणि निशांत सिंधू यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. हंगर्गेकरच्या अप्रतिम गोलंदाजीचा सामना करण्यात पाकिस्तानी संघ अयशस्वी ठरला. त्याने आठ षटकांत ४२ धावा देत ५ बळी घेतले.
भारत-पाकिस्तान यांच्यातल्या इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेत राजवर्धन हंगर्गेकर (Rajvardhan Hangargekar) चमकला. महाराष्ट्राच्या या गोलंदाजाने पाच बळी घेत पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडले. भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यात कोलंबो येथे ही लढत झाली. पाकिस्तान अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हंगर्गेकरने ८-१-४२-५ अशी अप्रितम स्पेल टाकून पाकिस्तानचा संपूर्ण संघ ४८ षटकांत २०५ धावांत माघारी पाठवला. भारतीय संघाने सलग दोन विजय मिळवून आधीच उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले होते.