R Sai Kishore, IND vs NEP: Asian Games 2023 मध्ये ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने नेपाळचा पहिल्या सामन्यात २३ धावांनी पराभव केला. टीम इंडियाने उपांत्यपूर्व फेरीतील विजयासह उपांत्य फेरी गाठली. या सामन्यातून साई किशोरने भारताकडून पदार्पण केले. आशियाई स्पर्धेत पहिल्यांदाच देशासाठी खेळणारा साई किशोर राष्ट्रगीत सुरू असताना भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले. मात्र, साई किशोरने आपल्या भावनांवर कसेबसे नियंत्रण ठेवले आणि नंतर सामन्यातही चांगली कामगिरी केली.
साई किशोर आयपीएलमध्ये गुजरात संघाकडून खेळतो आणि त्याने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याचवेळी, तो तामिळनाडू टी-20 लीगमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. या सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाल्यावर त्याने आपल्या निवडीला न्याय दिला.
साई किशोरने केला विक्रम
आपल्या पहिल्या वहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात आर साई किशोरने भारताकडून पदार्पण केले. या सामन्यात तीन झेल घेत एक खास विक्रम आपल्या नावावर केला. पदार्पणाच्या सामन्यात तीन झेल घेणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. साई किशोरला फलंदाजीची संधी मिळाली नाही, पण त्याने आपल्या चार षटकांत २५ धावा देत एक बळी घेतला.