नवी दिल्ली : सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (ENG vs AUS) यांच्यामध्ये टी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील सलामीचे दोन्ही सामने जिंकून इंग्लिश संघाने 2-0 ने मालिका खिशात घातली आहे. डेव्हिड मलानच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आणि सॅम करनच्या घातक गोलंदाजीमुळे इंग्लंडने मालिकेतील दुसरा सामना जिंकला. दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लिश संघाने कांगारूला 8 धावांनी पराभूत केले. यासोबत इंग्लंडने मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. तर मालिकेतील अखेरचा सामना 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
तत्पुर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून इंग्लिश संघास प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. इंग्लंडच्या डावाची सुरूवात निराशाजनक झाली होती. यानंतर मलान आणि मोईन अली यांनी पाचव्या बळीसाठी 92 धावांची भागीदारी नोंदवली. मोईन अलीने 27 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 44 धावा केल्या. मलानने 29 चेंडूत 82 धावांची सर्वाधिक खेळी केली. ज्यात त्याने सात चौकार आणि चार षटकार मारले. त्यामुळे इंग्लंडने निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 178 धावा केल्या.
2-0 ने मालिकेवरही केला कब्जा ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टॉइनिसने तीन, ॲडम झाम्पाने दोन, तर पॅट कमिन्स-मिचेल स्टार्क यांनी प्रत्येकी 1-1 बळी पटकावला. इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान संघाला अपयश आले. कांगारूचा संघ 20 षटकांत 6 बाद केवळ 170 धावा करू शकला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक 45 धावा केल्या, त्याने 29 चेंडूचा सामना करताना तीन चौकार आणि दोन षटकार ठोकले. याशिवाय टीम डेव्हिडने 20 चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 40 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून सॅम करनने 3 बळी, रिस टॉप्ले, बेन स्टोक्स आणि डेव्हिड विली यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.