ENG vs AUS 2nd ODI Match : पाच सामन्यांच्या वन डे मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने जिंकून ऑस्ट्रलियाने २-० अशी आघाडी घेतली. शनिवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात कांगारुंनी यजमानांच्या तोंडचा घास पळवला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करुन पकड बनवली होती, मात्र अखेरीस ॲलेक्स कॅरीने ७० धावा करुन सन्मानजनक धावसंख्या उभारली. इंग्लंडमधील हेडिंग्ले क्रिकेट ग्राऊंडवर ही लढत झाली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४४.४ षटकांत सर्वबाद २७० धावा केल्या. ॲलेक्स कॅरीशिवाय (७०) ऑस्ट्रेलियन सलामीवीर मॅट शॉर्ट (२९) आणि ट्रॅव्हिस हेड (२९) यांनी संयमी खेळी केली. त्यानंतर मिचेल मार्शने ६० धावा करुन आपल्या चाहत्यांना जागे केले.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला घाम फुटला. मिचेल स्टार्कच्या घातक गोलंदाजीसमोर कोणत्याच इंग्लिश फलंदाजाचा टिकाव लागला नाही. अखेर इंग्लंडचा संघ ४०.२ षटकांत सर्वबाद अवघ्या २०२ धावा करू शकला अन् ऑस्ट्रेलियाने दुसरा सामना ६८ धावांनी जिंकला. इंग्लंडकडून जेमी स्मिथ (४९) वगळता एकाही फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी सांघिक कामगिरी करत आपल्या संघाला सलग दुसरा विजय मिळवून दिला. मिचेल स्टार्क (३), जोश हेझलवुड, आरोन हार्डी आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले, तर ॲडम झाम्पाला एक बळी घेण्यात यश आले.
ऑस्ट्रेलियाची २-० अशी आघाडी
दरम्यान, पहिला वन डे सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने विजयी सलामी दिली होती. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ४९.४ षटकांत ३१५ धावा केल्या. इंग्लंडकडून बेन डकेट (९५), विल जॅक्स (६२) आणि हॅरी ब्रूकने (३९) धावा केल्या. इंग्लंडने दिलेल्या ३१६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने शतकी खेळी केली. त्याने नाबाद १५४ धावा करुन आपल्या संघाला विजय मिळवून दिला. याशिवाय मार्नस लाबुशेन (७७) आणि स्टीव्ह स्मिथने (३३) धावा केल्या.
Web Title: ENG vs AUS 2nd ODI Match Australia won the second match in a row to take a 2-0 lead in the series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.