ENG vs AUS 2nd ODI Match : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क त्याची गती आणि यॉर्करसाठी प्रसिद्ध आहे. स्टार्क जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. म्हणूनच आयपीएलच्या लिलावात त्याच्यावर विक्रमी बोली लागली होती. इंग्लंडविरुद्धच्या वन डे सामन्यात स्टार्कने त्याची प्रतिभा पुन्हा एकदा दाखवून दिली. पाच सामन्यांच्या वन डे मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने जिंकून ऑस्ट्रलियाने २-० अशी आघाडी घेतली. शनिवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात कांगारुंनी यजमानांच्या तोंडचा घास पळवला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करुन पकड बनवली होती, मात्र अखेरीस ॲलेक्स कॅरीने ७० धावा करुन सन्मानजनक धावसंख्या उभारली.
इंग्लंडमधील हेडिंग्ले क्रिकेट ग्राऊंडवर ही लढत झाली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४४.४ षटकांत सर्वबाद २७० धावा केल्या. ॲलेक्स कॅरीशिवाय (७०) ऑस्ट्रेलियन सलामीवीर मॅट शॉर्ट (२९) आणि ट्रॅव्हिस हेड (२९) यांनी संयमी खेळी केली. त्यानंतर मिचेल मार्शने ६० धावा करुन आपल्या चाहत्यांना जागे केले. २७० धावांचा बचाव करताना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी सांघिक कामगिरी केली. स्टार्कने इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकला एक अप्रतिम यॉर्कर टाकून बाहेरचा रस्ता दाखवला. ब्रूक ९ चेंडूत ४ धावा करुन तंबूत परतला.
इंग्लंडचा सलग दुसरा पराभवदरम्यान, पहिला वन डे सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने विजयी सलामी दिली होती. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ४९.४ षटकांत ३१५ धावा केल्या. इंग्लंडकडून बेन डकेट (९५), विल जॅक्स (६२) आणि हॅरी ब्रूकने (३९) धावा केल्या. इंग्लंडने दिलेल्या ३१६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने शतकी खेळी केली. त्याने नाबाद १५४ धावा करुन आपल्या संघाला विजय मिळवून दिला. याशिवाय मार्नस लाबुशेन (७७) आणि स्टीव्ह स्मिथने (३३) धावा केल्या.