England vs Australia, 3rd ODI : ग्लेन मॅक्सवेल आणि अॅलेक्स केरी यांच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या व निर्णायक सामन्यात यजमान इंग्लंडला पराभवाची चव चाखवली. ऑस्ट्रेलियानं या सामन्यात 3 विकेट्स राखून विजय मिळवून तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी खिशात घातली. ऑस्ट्रेलियाचे 5 फलंदाज 73 धावांत माघारी परतले होते, परंतु मॅक्सवेल आणि केरी यांनी तुफान फटकेबाजी करत इंग्लंडला हार मानण्यास भाग पाडले. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलनं एका विक्रमाला गवसणी घातली आणि तसं करताना त्यानं भारताचे महान कर्णधार कपिल देव यांचा विक्रम मोडला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडला पहिल्या दोन चेंडूंत दोन धक्के बसले. रॉयला झेलबाद करून माघारी पाठवल्यानंतर एका अप्रतिम चेंडूवर स्टार्कनं रूटला पायचीत केलं. त्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 67 धावा जोडल्या. अॅडम झम्पानं इंग्लंडच्या कर्णधाराला बाद केले. त्यापाठोपाठ आलेला जोस बटलरही लगेच माघारी परतला. पण, त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी केली. बेअरस्टो आणि सॅम बिलिंग यांनी 114 धावांची भागीदारी करताना संघाला मोठ्या आघाडीच्या दृष्टीनं वाटचाल करून दिली. बेअरस्टोने 126 चेंडूंत 12 चौकार व 2 षटकारासह 112 धावा केल्या. सॅम बिलिंगनेही 57 धावा केल्या. या दोघांच्या फटकेबाजीनंतर ख्रिस वोक्सनं 39 चेंडूंत 6 चौकारांसह 53 धावा चोपल्या. इंग्लंडने 7 बाद 302 धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना ख्रिस वोक्सनं ऑस्ट्रेलियाचे आघाडीचे फलंदाज अॅरोन फिंच आणि मार्कस स्टॉयनिस यांना बाद केले. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरनं तिसऱ्या विकेटसाठी मार्नस लाबुशेनसह खिंड लढवली. पण, जो रूटच्या अप्रतिम चेंडूंनं त्याचा त्रिफळा उडवला. त्यापाठोपाठ रूटनं मिचेल मार्शलाही बाद केलं. ऑस्ट्रेलियाचे 5 फलंदाज 73 धावांत माघारी परतले होते. त्यानंतर मॅक्सवेल आणि केरी यांनी सहाव्या विकेटसाठी 212 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाकडून सहाव्या विकेटसाठी ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. या दोघांनी 14 वर्षांपूर्वी ब्रॅड हॅडीन व मायकेल हसी यांचा ( 165 धावा वि. वेस्ट इंडिज) यांचा विक्रम मोडला.