ENG vs AUS 4th ODI Josh Inglis : सध्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या वन डे मालिकेचा थरार रंगला आहे. सुरुवातीचे दोन सामने जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाची गाडी रुळावरुन घसरली. इंग्लंडने मागील दोन सामने जिंकून २-२ अशी बरोबरी साधली. त्यामुळे अखेरचा सामना निर्णायक असेल. शुक्रवारी या मालिकेतील चौथा सामना खेळवला गेला. इंग्लंडने सहज विजय मिळवत विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली. चौथा सामना लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळला गेला.
इंग्लंडने चौथा सामना अगदी सहज जिंकला. मात्र या सामन्यादरम्यान मोठा वाद निर्माण झाला होता. मग स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक जोश इंग्लिसला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आता हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. खरे तर ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक जोश इंग्लिसला वादग्रस्त झेलचा दावा केल्यामुळे प्रेक्षकांच्या प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. हा प्रकार इंग्लंडच्या डावाच्या सतराव्या षटकात घडला. मिचेल स्टार्कने टाकलेला चेंडू इंग्लिश फलंदाज हॅरी ब्रूकच्या बॅटला स्पर्श करुन यष्टीरक्षकाकडे गेला. इंग्लिसने त्याच्या ग्लोव्हजमध्ये चेंडू असल्याचा दावा केला, ज्याला पंचांनी प्रथम प्रतिसाद दिला पण नंतर सत्य समोर आले.
इंग्लंडच्या संघाने पंचांनी दिलेल्या या निर्णयाला आव्हान दिले, त्यानंतर प्रकरण तिसऱ्या पंचाकडे गेले. जोश इंग्लिसच्या हातापर्यंत चेंडू पोहोचण्यापूर्वीच चेंडू जमिनीला स्पर्श झाल्याचे रिप्लेमध्ये दिसून आले. प्रेक्षकांनी हे पाहिल्यानंतर त्यांनी विरोध केला आणि इंग्लिसची खिल्ली उडवली. दरम्यान, चौथ्या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ३१२ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ अवघ्या १२६ धावांत गारद झाल्याने इंग्लंडने तब्बल १८६ धावांनी सामना जिंकला. या विजयासह यजमानांनी मालिकेत बरोबरी साधली. त्यामुळे पाचवा सामना निर्णायक असेल.