ENG vs AUS 5th ODI : आज रविवारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होत आहे. सध्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या वन डे मालिकेचा थरार रंगला आहे. सुरुवातीचे दोन सामने जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाची गाडी रुळावरुन घसरली. इंग्लंडने मागील दोन सामने जिंकून २-२ अशी बरोबरी साधली. त्यामुळे आज होत असलेला अखेरचा सामना निर्णायक आहे. शुक्रवारी या मालिकेतील चौथा सामना खेळवला गेला. इंग्लंडने सहज विजय मिळवत विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली. सीट युनिक स्टेडियमवर होत असलेल्या लढतीतील विजयी संघ मालिका जिंकेल. विशेष बाब म्हणजे आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथ करत आहे. निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
ऑस्ट्रेलियाचा संघ -स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅट शॉर्ट, जोश इंग्लिस, मार्नस लाबूशेन, ग्लेन मॅक्सवेल, आरोन हार्डी, कूपर कॉन्ली, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेझलवुड.
इंग्लंडचा संघ - हॅरी ब्रूक (कर्णधार), फिल सॉल्ट, बेन डकेट, विल जॅक्स, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकोब बेथल, ब्रिडॉन कर्स, मॅथ्यू पोट्स, ओली स्टोन, आदिल राशिद.
इंग्लंडचे जोरदार पुनरागमनदरम्यान, पहिले दोन सामने गमावल्यानंतर यजमानांनी तिसरा आणि चौथा सामना जिंकला. चौथ्या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ३१२ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ अवघ्या १२६ धावांत गारद झाल्याने इंग्लंडने तब्बल १८६ धावांनी सामना जिंकला. या विजयासह यजमानांनी मालिकेत बरोबरी साधली. त्यामुळे पाचवा सामना निर्णायक झाला आहे.