rishi sunak and anthony albanese | नवी दिल्ली : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत असलेली बहुचर्चित ॲशेस मालिका सध्या वादामुळे चर्चेत आहे. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून पाहुण्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने २-० अशी आघाडी घेतली आहे. खरं तर दुसरा कसोटी सामना अनेक नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिला. या सामन्यातील एक वादग्रस्त विकेट आजही वर्तमानपत्रात झळकत आहेत. दुसऱ्या सामन्यातील पराभवापेक्षा इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टोला ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक अलेक्स कॅरीने अखिलाडीवृत्तीने यष्टिचीत केल्याने वादाला तोंड फुटले. या वादावरून दोन्ही देशाचे पंतप्रधान देखील आमनेसामने आल्याचे दिसते.
खरं तर अखिलाडीवृत्तीने बेअरस्टोला बाद केल्याचे सांगत इंग्लिश खेळाडूंसह प्रशिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. यावर बोलताना इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने पत्रकार परिषदेतून उघड नाराजी बोलून दाखवली. बेन स्टोक्सला सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बेअरस्टोच्या विकेटबद्दल विचारले असता त्याने म्हटले, "मैदानातील पंचांनी काही हालचाल केली होती का? ते निर्णायक षटक होते का? मला माहिती नाही. जॉनी आपल्या क्रीझवर होता आणि नंतर बाहेर पडला. पण त्याला बाद दिले गेले आता मला याविषयी काहीही बोलायचे नाही." दरम्यान, बेअरस्टोच्या विकेटवरून दोन्ही संघाचे कर्णधार आमनेसामने आले होते. बेन स्टोक्सने नाराजी व्यक्त केली तर पॅट कमिन्सने पंचांचा निर्णय अंतिम असल्याचे म्हटले. अशातच ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक म्हणाले की, जॉनी बेअरस्टोला बाद करण्याची पद्धत खेळ भावनेला शोभणारी नाही. यासोबतच त्यांनी बेन स्टोक्सच्या क्रीडाप्रवृत्तीच्या विधानाचे देखील समर्थन केले.
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी म्हटले...दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी देखील या वादात उडी घेतली असून आपल्या संघाचे समर्थन केले आहे. ऑस्ट्रेलिया आपल्या राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या पाठीशी उभा असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. अल्बानीज म्हणाले, "मला पुरुष आणि महिला क्रिकेट संघांचा अभिमान आहे, ज्यांनी इंग्लंडविरुद्धचे पहिले दोन ॲशेस सामने जिंकले आहेत."
"पंतप्रधान ऋषी सुनक यांची नाराजी मला समजते. पण प्राथमिक शाळेत त्यांना 'तुमच्या क्रीजमध्ये राहा' असे धडे मिळाले नसावेत. ते मी शाळेतच शिकलो आहे. आशा आहे की ते ठीक असतील", अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी ऋषी सुनक यांना टोला लगावला.
नेमकं काय घडलं? दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावाच्या ५२व्या षटकात कॅमेरून ग्रीनने टाकलेला चेंडू चुकवण्यासाठी जॉनी बेअरस्टो खाली वाकला. चेंडू निर्धाव गेला अन् षटक संपले असे गृहीत धरून बेअरस्टो क्रीझला पाय घासून पुढे गेला. तेवढ्यात ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक कॅरीने चेंडू यष्ट्यांवर मारला आणि कांगारूच्या खेळाडूंनी अपील केली. पण नियमानुसार चेंडू डेड झाला नव्हता. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी बेअरस्टोला बाद केले अन् इंग्लंडला मोठा झटका बसला.