England vs Australia, 1st ODI : डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ व ट्रॅव्हिस हेड यांच्या दमदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या वन डे सामन्यात इंग्लंडवर ६ विकेट्स राखून विजय मिळवला. इंग्लंडच्या डेवीड मलानची शतकी खेळी व्यर्थ ठरली.
ऑस्ट्रेलियाने एडिलेड येथे सुरू असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फिल सॉल्ट ( १४)व जेसन रॉय ( ६) हे सलामीवीर पहिल्या पाच षटकांत माघारी परतले. जेम्स व्हिंसी ( ५) व सॅम बिलिंग्स ( १७) माघारी परतल्याने इंग्लंडची अवस्था ४ बाद ६६ अशी झाली होती. पण, डेव्हिड मलान व कर्णधार जोस बटलर ( २९) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांची ५२ धावांची भागीदारी अॅडम झम्पाने संपुष्टात आणली.
लिएम डॉसन ( ११) रन आऊट झाला, ख्रिस जॉर्डननेही ( १४) काही काळ किल्ला लढवला. मलान एकाबाजूने दमदार फटकेबाजी करत होता. ४६व्या षटकात त्याचा झंझावात रोखला गेला. झम्पाने ही विकेट मिळवून दिली. मलान १२८ चेंडूंत १२ चौकार व ४ षटकारांसह १३४ धावा करून माघारी परतला. झम्पाने ५५ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. इंग्लंडने ९ बाद २८७ धावा केल्या. प्रत्युत्तरात,
डेव्हिड वॉर्नर व ट्रॅव्हिस हेड यांनी पहिल्या विकेटसाठी विक्रमी १४७ धावांची भागीदारी केली. इंग्लंडविरुद्धची ऑस्ट्रेलियन ओपनर्सची ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. हेड ५७ चेंडूंत १० चौकार व १ षटकारासह ६९ धावा करून जॉर्डनच्या गोलंदाजीवर बाद झाला.
वॉर्नर व स्टीव्ह स्मिथ या अनुभवी जोडीने इंग्लंडला पुन्हा सतावले आणि ५३ धावांची भागीदारी केली. वॉर्नरला शतकाने हुलकावणी दिली आणि तो ८६ धावांवर ( १० चौकार व १ षटकार) बाद झाला. स्मिथने अखेरपर्यंत चिवट खेळ करताना नाबाद ८० धावांची खेळी करून ऑस्ट्रेलियाला ६ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतली. कॅमरून ग्रीन यानेही नाबाद २० केल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: ENG vs AUS : Australia won by 6 wickets (with 19 balls remaining), Brilliant knocks from Travis Head, David Warner and Steve Smith
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.