Josh Inglis Record Joint Fastest Century In Champions Trophy History With Virender Sehwag : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत शतकांची अक्षरश: 'बरसात' होताना पाहायला मिळत आहे. चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन बॅटर जोस इंग्लिसच्या भात्यातून यंदाच्या स्पर्धेतील सातवे शतक पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियन विकेट किपर बॅटरसाठी हे शतक खूपच खास ठरते. कारण त्याचे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतीलच नव्हे तर वनडे कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे. एवढेच नाही हे शतक झळकवताना संघाला त्याने विक्रमी विजय मिळवून दिला. आता या गोष्टीवरही त्याच्या शतकाची स्टोरी संपत नाही. या मॅच विनिंग सेंच्युरीसह त्याने भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्या विक्रमाशी बरोबरी केलीये. जाणून घेऊयात या खास विक्रमासंदर्भातील स्टोरी
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जलद शतकी खेळीसह जोस इंग्लिसनं केली सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी, त्यातही कमालीचा योगायोग
इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात जोस इंग्लिशनं वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकवण्यासाठी ७७ चेंडूचा सामना केला. यासह त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सेहवागच्या जलद शतकी खेळीच्या विक्रमाशी बरोबरी केली. कमालीचा योगायोग हा की, २००२ च्या हंगामात सेहवागनेही इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातच ७७ चेंडूत शतक साजरे केले होते. फरक फक्त एवढाच तो म्हणजे सेहवाग १०४ चेंडूत १२६ धावांची खेळी करून आउट झाला होता. पण लाहोरच्या मैदानात जोस इंग्लिस ८६ चेंडूत १२० धावा करून नाबाद राहिला.
वनडेतील पहिल्या सेंच्युरीसह खास क्लबमध्येही मारली एन्ट्री
जोस इंग्लिस हा ऑस्ट्रेलियाकडून तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळताना पाहायला मिळाले आहे. दोन कसोटी सामन्यात त्याच्या खात्यात एका शतकाची नोंद आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्येही त्याच्या भात्यातून शतक आले आहे. वनडेतील पहिल्या शतकासह आता तो ऑस्ट्रेलियाकडून तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक झळकवणाऱ्या खेळाडूंच्या खास क्लबमध्ये एन्ट्री मारली आहे. ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक झळकवणारा तो चौथा खेळाडू ठरलाय. याआधी शेन वॉटसन, ग्लेन मॅक्सवेल आणि डेविड वॉर्नर यांनी कसोटी, वनडे आणि टी-२० मध्ये ऑस्ट्रेलियाकडून शतकी खेळी केली होती. या यादीत आता जोस इंग्लिसचाही समावेश झाला आहे.