England vs Ireland, T20 World Cup : भारत-पाकिस्तान तसा इंग्लंड-आयर्लंड सामना असतो आणि त्यामुळेच दोन्ही संघ मोठ्या ठसनने एकमेकांविरुद्ध खेळतात. ग्रुप १ मध्ये २ गुणांसह तालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडसमोर आज आयर्लडचे आव्हान आहे. आयर्लंडने यापूर्वी इंग्लंडला मोठ्या स्पर्धांमध्ये पराभवाचा झटका दिला आहे. पावसामुळे उशीरा सुरू झालेल्या या लढतीत आयर्लंडच्या फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी केली. अँड्य्रू बॅलबर्नली व लॉकर टकर यांनी विक्रमी भागीदारी केली. लिएम लिव्हिंगस्टोनने ३ विकेट्स घेत इंग्लंडला पुनरागमन करून देण्याचा प्रयत्न केला.
आयर्लंडच्या फलंदाजांनी इंग्लंडची धुलाई केली; पण, सेट जोडी विचित्र पद्धतीने तुटली, Video
पॉल स्टर्लिंगने ८ चेंडूंत १४ धावा करताना आक्रमक सुरुवात करून दिली. मार्क वूडने त्याची विकेट घेतली. अँड्य्रू बॅलबर्नली व लॉकर टकर यांनी सुरेख फटेकबाजी करताना पहिल्या पॉवर प्लेमध्ये ५०+धावा फलकावर चढवल्या. ख्रिस वोक्सने टाकलेल्या १०व्या षटकात बॅलबर्नीने १८ धावा चोपल्या आणि आयर्लंडने ९२ धावा फलकावर चढवल्या. १२व्या षटकात आदिश रशिदच्या गोलंदाजीवर आयर्लंडची ही सेट जोडी विचित्र पद्धतीने माघारी परतली. बॅलबर्नलीने मारलेला चेंडू रशिदच्या हाताला लागून नॉन स्ट्रायकर एंडवरील स्टम्प्सवर आदळला. टकर बराच पुढे आला होता आणि त्याला रन आऊट होऊन माघारी परतावे लागले. टकर ( ३४) बाद झाल्याने ५७ चेंडूंत ८२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारीही तुटली. नवा फलंदाज मैदानावर आल्यावर मार्क वूडला बोलावले गेले आणि त्याने हॅरी टेक्टरला ( ०) बाद केले.
बॅलबर्नलीने अर्धशतक पूर्ण करताना धावांची गती वाढवली आणि यावेळी त्याला कर्टीस कॅम्फेरची साथ मिळाली. १६व्या षटकात मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅलबर्नली झेलबाद झाला. त्याने ४७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ६२ धावा केल्या. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये अर्धशतक झळकावणारा बॅलबर्नली हा आयर्लंडचा पहिलाच कर्णधार ठरला. पुढच्याच चेंडूवर लिएम लिव्हिंगस्टोनने आयर्लंडच्या जॉर्ज डॉक्रेलचा (०) त्रिफळा उडवला. लिव्हिंगस्टोनही हॅटट्रिक पूर्ण झाली नाही. सॅम कुरन व लिव्हिंगस्टोन यांनी अखेरच्या षटकांत आणखी विकेट घेत इंग्लंडला पुनरागमन करून दिले. मार्क वूडने ३, लिव्हिंगस्टोनने ३ आणि सॅम कुरनने दोन विकेट्स घेतल्या. १ बाद १०३ वरून आयर्लंडचा संपूर्ण संघ १५७ धावांत माघारी परतला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"