England vs Ireland, T20 World Cup : पावसामुळे उशीरा सुरू झालेल्या या लढतीत आयर्लंडच्या फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी केली. अँड्य्रू बॅलबर्नली व लॉकर टकर यांनी विक्रमी भागीदारी केली. पण, लिएम लिव्हिंगस्टोन, मार्क वूड व सॅम कुरन यांनी इंग्लंडला पुनरागमन करून दिले. १५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला पहिल्या षटकात धक्का बसला, पण बेन स्टोक्सची ( Ben Stokes) विकेट चर्चेची ठरली. फ्लोन हँडने ( Flonn Hand) अप्रतिम चेंडूवर स्टोक्सचा त्रिफळा उडवला. डकवर्थ लुईस प्रणालीनुसार इंग्लंडचा संघ १४ धावांनी मागे आहे आणि आत पाऊस पडल्यास त्यांचा पराभव पक्का होईल.
आयर्लंडने गमावल्या ५४ धावांत ९ विकेट्स; इंग्लंडच्या गोलंदाजांना झोडून काढल्यानंतर घसरली गाडी
पॉल स्टर्लिंगने ( १४) माघारी परतल्यानंतर बॅलबर्नली व टकर यांनी सुरेख फटेकबाजी केली. १२व्या षटकात आदिश रशिदच्या गोलंदाजीवर आयर्लंडची ही सेट जोडी विचित्र पद्धतीने माघारी परतली. बॅलबर्नलीने मारलेला चेंडू रशिदच्या हाताला लागून नॉन स्ट्रायकर एंडवरील स्टम्प्सवर आदळला. टकर बराच पुढे आला होता आणि त्याला रन आऊट होऊन माघारी परतावे लागले. टकर ( ३४) बाद झाल्याने ५७ चेंडूंत ८२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारीही तुटली. बॅलबर्नलीने ४७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ६२ धावा केल्या. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये अर्धशतक झळकावणारा बॅलबर्नली हा आयर्लंडचा पहिलाच कर्णधार ठरला. मार्क वूडने ३, लिव्हिंगस्टोनने ३ आणि सॅम कुरनने दोन विकेट्स घेतल्या. १ बाद १०३ वरून आयर्लंडचा संपूर्ण संघ १५७ धावांत माघारी परतला. प्रत्युत्तरात इंग्लंडलाही धक्के बसलेच... जॉश लिटनने पहिल्याच षटकात इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर ( ०) याला माघारी पाठवले, त्यानंतर अॅलेक्स हेल्सची ( ७) विकेट घेत १४ धावांवर दुसरा धक्का दिला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडच्या कर्णधाराला दोन वेळा शून्यावर बाद करणारा आयर्लंड हा पहिलाच संघ ठरला. यापूर्वी २०१०मध्ये पॉल कॉलिंगवूडला त्यांनी शून्यावर माघारी पाठवले होते. बेन स्टोक्स व डेवीड मलान इंग्लंडचा डाव सावरतील असे वाटले होते, परंतु फ्लोन हँडने चमत्कार केला. हँडने टाकलेला चेंडू बेन स्टोक्सला कळलाच नाही आणि बॅट-पॅड मधून तो यष्टींवर आदळला. स्टोक्स ६ धावांवर माघारी परतला अन् इंग्लंडची अवस्था ३ बाद २९ अशी झाली. इंग्लंडला पहिल्या पॉवर प्लेमध्ये ३ बाद ३७ धावा करता आल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"