England vs Ireland, T20 World Cup : आयर्लंडने मोठ्या स्पर्धांमध्ये इंग्लंडला धक्का देण्याचे सत्र ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही कायम राखले. अँड्य्रू बॅलबर्नली व लॉकर टकर यांच्या दमदार खेळीनंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी संघाला कमबॅक करून दिले. पण, १५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा निम्मा संघ ८६ धावांत माघारी परतला. पावसामुळे हा सामना उशीरा सुरू झाला आणि पुन्हा पाऊस पडल्यास डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंड मागे होता. आयर्लंडच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना नेट रन रेट वाढता राखला आणि त्याचे दडपण इंग्लंडवर जाणवत होते. २०११च्या वर्ल्ड कप स्पर्धेत बंगळुरू येथे इंग्लंडचे ३२७ धावांचे लक्ष्य केव्हिन ओ'ब्रायनच्या वादळी खेळीच्या जोरावर आयर्लंडने पार करून धक्कादायक निकाल नोंदवला होता. आजही आयर्लंडने DLS नुसार ५ धावांनी सामना जिंकला.
ENG vs IRE, T20 World Cup : 'दी ग्रेट' बेन स्टोक्सचा त्रिफळा उडाला, चेंडू बॅट अँड पॅड मधून कसा गेला त्यालाच नाही समजला, Video
पॉल स्टर्लिंगने ( १४) माघारी परतल्यानंतर बॅलबर्नली व टकर यांनी सुरेख फटेकबाजी केली. १२व्या षटकात आदिश रशिदच्या गोलंदाजीवर आयर्लंडची ही सेट जोडी विचित्र पद्धतीने माघारी परतली. बॅलबर्नलीने मारलेला चेंडू रशिदच्या हाताला लागून नॉन स्ट्रायकर एंडवरील स्टम्प्सवर आदळला. टकर बराच पुढे आला होता आणि त्याला रन आऊट होऊन माघारी परतावे लागले. टकर ( ३४) बाद झाल्याने ५७ चेंडूंत ८२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारीही तुटली. बॅलबर्नलीने ४७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ६२ धावा केल्या. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये अर्धशतक झळकावणारा बॅलबर्नली हा आयर्लंडचा पहिलाच कर्णधार ठरला. मार्क वूडने ३, लिव्हिंगस्टोनने ३ आणि सॅम कुरनने दोन विकेट्स घेतल्या. १ बाद १०३ वरून आयर्लंडचा संपूर्ण संघ १५७ धावांत माघारी परतला.
प्रत्युत्तरात इंग्लंडलाही धक्के बसलेच... जॉश लिटनने पहिल्याच षटकात इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर ( ०) याला माघारी पाठवले, त्यानंतर अॅलेक्स हेल्सची ( ७) विकेट घेत १४ धावांवर दुसरा धक्का दिला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडच्या कर्णधाराला दोन वेळा शून्यावर बाद करणारा आयर्लंड हा पहिलाच संघ ठरला. यापूर्वी २०१०मध्ये पॉल कॉलिंगवूडला त्यांनी शून्यावर माघारी पाठवले होते. बेन स्टोक्स व डेवीड मलान इंग्लंडचा डाव सावरतील असे वाटले होते, परंतु फ्लोन हँडने चमत्कार केला. हँडने टाकलेला चेंडू बेन स्टोक्सला कळलाच नाही आणि बॅट-पॅड मधून तो यष्टींवर आदळला. स्टोक्स ६ धावांवर माघारी परतला अन् इंग्लंडची अवस्था ३ बाद २९ अशी झाली. इंग्लंडला पहिल्या पॉवर प्लेमध्ये ३ बाद ३७ धावा करता आल्या.
मलान व हॅरी ब्रूक यांनी डाव सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला अन् नशिबही त्यांनी साथ देताना दिसले. ११व्या षटकात सलग दोन चेंडूंवर या दोघांचे झेल सुटले. पण, जॉर्ज डॉक्रेलने पाचव्या चेंडूवर ब्रूकला ( १८) चूक करण्यास भाग पाडले आणि यावेळेस गॅरेथ डेलनीने झेल घेतला. १४व्या षटकात बॅरी मॅकार्थीच्या चेंडूवर फटका मारण्याच्या प्रयत्नात मलान ( ३५) झेलबाद होऊन माघारी परतला. इंग्लंडला निम्मा संघ ८६ धावांवर माघारी परतला. मेलबर्नवर इंग्लंडला ३ पैकी एकही सामना जिंकता आलेला नव्हता आणि त्यामुळे त्यांची चिंता आणखी वाढली होती. १४.३ षटकं असताना पाऊस आला अन् इंग्लंड तेव्हा ५ बाद १०५ धावांवर होता. डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंड ५ धावांनी मागे होता. पावसाचा जोर कायम राहिल्याने सामना रद्द करावा लागला आणि ५ धावांनी आयर्लंडने हा सामना जिंकला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: ENG vs IRE, T20 World Cup : Ireland beat England by 5 runs according to the DLS method in Super 12.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.