ENG vs NZ 2nd Test : इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातली दुसरी कसोटी रंगतदार अवस्थेत आहे. यजमान इंग्लंडच्या फलंदाजांनी टी ब्रेकनंतर बदललेला गिअर पाहून सारेच अवाक् झाले आहेत. कर्णधार बेन स्टोक्स व जॉनी बेअरस्टो ( Johnny Bairstow ) यांनी वातावरण बदलले. टी ब्रेकपूर्वी हे दोघं वन डे स्टाईल खेळत होते, पण ब्रेकनंतर अचानक बेअरस्टोने ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी सुरू केली. स्टोक्स व बेअऱस्टो यांनी ९ षटकांत १०२ धावा चोपल्या. बेअरस्टोने शतक झळकावले, परंतु त्यासाठी १ चेंडू कमी खेळला असता तर १२० वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली असती.
बेअरस्टोने ७७ चेंडूंत शतक पूर्ण केले. इंग्लंडकडून हे कसोटीतील दुसरे सर्वात जलद शतक ठरले. त्याने बेन स्टोक्सचा २०१५ सालचा ८५ चेंडूंत शतकाचा ( वि. न्यूझीलंड) विक्रम मोडला. इंग्लंडकडून गिलबर्ट जेसोप यांनी १९२०साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७६ चेंडूंत शतक झळकावले होते. बेअरस्टोच्या शतकी खेळीत ९ चौकार व ५ षटकारांचा समावेश होता. त्याने स्टोक्ससोबत १५०+ भागीदारी केली आहे. तो सध्या ८८ चेंडूंत १२ चौकार व ७ षटकारांसह १२७ धावांवर खेळतोय, तर स्टोक्स ५० धावांवर खेळतोय. इंग्लंडने ४ बाद २५४ धावा केल्या असून त्यांना ४५ धावा करायच्या आहेत.