Ball in Beer Glass ENG vs NZ 2nd Test Funny Video: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याची सध्या चांगलीच उत्सुकता आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजी करत असताना त्यांनी त्रिशतकापार मजल मारली. यासोबतच नॉटिंगहॅम येथे सुरू असलेल्या या सामन्यात एक विचित्र आणि तितकाच मजेशीर प्रकार पाहायला मिळाला. सामना सुरू असताना फलंदाजाने असा फटका मारला की चेंडू थेट स्टँडमध्ये बसलेल्या प्रेक्षक महिलेच्या बिअर ग्लासमध्ये जाऊन पडला.
न्यूझीलंडच्या संघाने १६९ धावांवर आपले चार गडी गमावले होते परंतु त्यानंतर टॉम ब्लंडल आणि डॅरेल मिशेल यांच्यात दमदार भागीदारी झाली. संघाची धावसंख्या ४ बाद २१० अशी होती, त्यावेळी हा मजेशीर प्रकार साऱ्यांना पाहायला मिळाला. इंग्लंडचा गोलंदाज जॅक लीचच्या चेंडूवर डॅरेल मिशेलने षटकार ठोकला. चेंडू थेट स्टँडमध्ये गेला. सुदैवाने चेंडू कोणालाही लागला नाही. पण तिथे एक महिला बिअरचा ग्लास घेऊन बसली होती. चेंडू थेट त्या ग्लासमध्ये गेला आणि सारेच हसू लागले.
चेंडू थेट बिअरच्या ग्लासमध्ये पडला, पाहा व्हिडीओ-
इंग्लंडच्या फिल्डरने इशारा करत अंपायरला सांगितले की चेंडू थेट महिलेच्या हातात असलेल्या ग्लासमध्ये पडला आहे. यानंतर, जेव्हा चेंडू परत आला तेव्हा पंचांनी तो टॉवेलने स्वच्छ केला. पण त्यामुळे इंग्लंडचे मोठे नुकसान झाले. कारण बिअरमध्ये गेल्यानंतर चेंडू ओला झाला. त्यामुळे चेंडू स्विंग झाला नाही आणि अंपायरने चेंडू बदलला देखील नाही. त्यामुळे यानंतर न्यूझीलंडची एकही विकेट पडली नाही. त्यामुळे पहिल्या दिवसाच्या खेळाअखेर न्यूझीलंडची धावसंख्या ४ बाद ३१८ अशी राहिली.
Web Title: ENG vs NZ 2nd Test Funny Video Watch Cricket ball hit directly into spectator beer glass at Trent Bridge
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.