ENG vs NZ 2nd Test : इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रापर्यंत दोन्ही संघांनी मिळून ९००च्या आसपास धावा केल्या. न्यूझीलंडच्या ५५३ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडकडूनही तोडीसतोड खेळ झाला. ऑली पोप ( Ollie Pope) आणि जो रूट ( Joe Root) यांच्या शतकी खेळीने इंग्लंडला मजबूत स्थितीत आणले. इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने कसोटीतील २७वे शतक झळकावताना स्टीव्ह स्मिथ ( ८५ सामने), विराट कोहली ( १०१ सामने) यांच्या कसोटी शतकांशी बरोबरी केली. केन विलियम्सन २४ ( ८७ सामने) याला मागे टाकले. पण, रूटने आज महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांचा विक्रम मोडला.
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडकडून डॅरील मिचेल ( १९०) व टॉम ब्लंडल ( १०६) यांनी शतकी खेळी केली. विल यंग ( ४७), डेव्हॉन कॉनवे ( ४६) व मिचेल ब्रासवेल ( ४९) यांनीही दमदार खेळ केला. प्रत्युत्तरात इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॅवली ( ४) लगेच बाद झाला. अॅलेक्स लीस ( ६७ ) व ऑली पोप यांनी शतकी भागीदारी करताना इंग्लंडच्या डावाला आकार दिला. त्यानंतर पोप व रूट यांनी न्यूझीलंडची परीक्षा घेतली. दोघांनी १८७ धावा जोडल्या. पोप २३९ चेंडूंत १३ चौकार व ३ षटकार मारून १४५ धावांवर बाद झाला. रूटनेही कसोटीतील २७वे शतक पूर्ण केले. मागील २२ कसोटींतील त्याचे हे १०वे शतक ठरले. २०१२ ते २०२० या कालावधीत रूटने १७ शतकं व ४९ अर्धशतकं झळकावली होती, परंतु २०२१-२०२२मध्ये त्याने १० शतकं व ४ अर्धशतकं झळकावली.
रुटने ११३ धावांच्या खेळीसह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत सुनील गावस्कर यांना मागे टाकले. गावस्कर यांच्या नावावर १०१२२ धावा आहेत. रुटने १०१२५ धावांचा पल्ला आज ओलांडला आहे. तो अजूनही खेळतोय आणि इंग्लंडने ४ बाद ३६१ धावा केल्या आहेत. जॉनी बेअरस्टो ८ धावांवर माघारी परतला.
Web Title: ENG vs NZ 2nd Test : Joe Root has overtaken Sunil Gavaskar in the Test run-getters list, He has scored 10 hundreds in the last 22 Test matches
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.