Join us  

ENG vs NZ 2nd Test : दोन चेंडूंत न्यूझीलंडचे सलामीवीर माघारी परतले; बेन स्टोक्स, जेम्स अँडरसनने इंग्लंडला यश मिळवून दिले

ENG vs NZ 2nd Test : पहिल्या कसोटीतील पराभवानंतर न्यूझीलंडला मालिका वाचवण्यासाठी आजपासून सुरू झालेली कसोटी जिंकणे आवश्यक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 5:42 PM

Open in App

ENG vs NZ 2nd Test : पहिल्या कसोटीतील पराभवानंतर न्यूझीलंडला मालिका वाचवण्यासाठी आजपासून सुरू झालेली कसोटी जिंकणे आवश्यक आहे. पण त्यात केन विलियम्सनला कोरोनाची लागण झाल्यामुळे माघार घ्यावी लागली आणि इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत टॉम लॅथमकडे नेतृत्वाची धुरा गेली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. २१व्या षटकापर्यंत स्टोक्सचा हा निर्णय चुकला असे वाटत असताना कर्णधाराने सामना फिरवला अन् दोन चेंडूंत किवींचे दोन्ही सलामीवीर माघारी परतले.

टॉम लॅथम व विल यंग यांनी न्यूझीलंडला चांगली सुरुवात करून दिली. जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, मॅथ्यू पॉट्स हे पहिल्या कसोटीतील नायक चांगली गोलंदाजी करत होते, परंतु त्यांना यश मिळत नव्हते. त्यामुळे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमही काहीसे निराश दिसले. विल यंग आक्रमक खेळ करताना दिसला, तर ल‌ॅथम दुसऱ्या बाजूने विकेट टिकवून होता. पण, २१व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर  बेन स्टोक्सने ही जोडी तोडली. ७० चेंडूंत ९ चौकारांच्या मदतीने ४७ धावा करणाऱ्या विल यंगला त्याने बाद केले. झॅक क्रॅवलीने त्याचा झेल घेतला. 

त्यानंतर पुढच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जेम्स अँडरसनने किवींचा दुसरा सलामीवीर लॅथमला माघारी पाठवले. मॅथ्यू पॉट्सने सुरेख झेल घेतला.  दोन चेंडूंत दोन्ही सलामीवीर माघारी परतल्याने किवी बचावात्मक पवित्र्यात गेले. अँडरसनची ही ६४७वी कसोटी विकेट ठरली आणि आता कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तिसऱ्या स्थानी येण्यासाठी तीन विकेट्सची गरज आहे.   दरम्यान पहिल्या कसोटीत इंग्लंडने ५ विकेट्स राखून विजय मिळवला. नाबाद ११५ धावा करणारा जो रूट मॅन ऑफ दी मॅच ठरला. न्यूझीलंडचा पहिला डाव १३२ धावांत गुंडाळल्यानंतर इंग्लंडलाही १४१ धावा करता आल्या. त्यानंतर किवींनी दुसऱ्या डावात २८५ धावा केल्या आणि इंग्लंडने २७९ धावांचे लक्ष्य ५  विकेट्स राखून सहज पार केले. मॅथ्यू पॉट्सने सामन्यात ७, जेम्स अँडरसनने ६ आणि स्टुअर्ट ब्रॉडने ४ विकेट्स घेतल्या.  

 

टॅग्स :इंग्लंडन्यूझीलंडजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाबेन स्टोक्सजेम्स अँडरसन
Open in App