ENG vs NZ: चेंडू आला अन् गोळीगत गेला! मार्क वुडने 155 प्रति ताशी वेगाने टाकला चेंडू, पाहा VIDEO 

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 06:07 PM2022-11-01T18:07:22+5:302022-11-01T18:09:06+5:30

whatsapp join usJoin us
ENG vs NZ Mark Wood sets record for fastest bowler in World Cup 2022 with 155 per hour | ENG vs NZ: चेंडू आला अन् गोळीगत गेला! मार्क वुडने 155 प्रति ताशी वेगाने टाकला चेंडू, पाहा VIDEO 

ENG vs NZ: चेंडू आला अन् गोळीगत गेला! मार्क वुडने 155 प्रति ताशी वेगाने टाकला चेंडू, पाहा VIDEO 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ब्रिस्बेन : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. आज या स्पर्धेत न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात सामना पार पडला. अटीतटीच्या लढतीत इंग्लिश संघाने बाजी मारून गुणतालिकेत मोठी झेप घेतली. हे दोन्हीही संघ अ गटात असून आजच्या सामन्याच्या निकालामुळे इंग्लंडचा मोठा फायदा झाला आहे. इंग्लिश संघाने 5 गुणांसह दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 179 धावा उभारल्या होत्या. ज्याचा पाठलाग करताना किवी संघाला अपयश आले. खरं तर इंग्लंडच्या या विजयामुळे यजमान ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या 5 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. 

इंग्लंडने प्रथम फलंदाजी करून न्यूझीलंडचा 180 धावांचे तगडे आव्हान दिले होते. ज्याचा पाठलाग करताना किवी संघाला अपयश आले. न्यूझीलंडकडून सलामीवीर डेव्होन कॉनवे (3) धावा करून तंबूत परतला. कर्णधार केन विलियमसनने 40 चेंडूत 40 धावांची सावध खेळी केली मात्र त्यालाही खेळपट्टीवर जास्त वेळ टिकता आले नाही. ग्लेन फिलिप्सने 36 चेंडूत 62 धावांची ताबडतोब खेळी करून किवी संघाचे सामन्यात पुनरागमन केले मात्र सॅम करणने न्यूझीलंडच्या आशेवर पाणी टाकले. किवी संघाच्या मधल्या फळीने इंग्लिश गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. अखेर इंग्लंडने 20 धावांनी शानदार विजय मिळवला. न्यूझीलंडचा संघ 20 षटकांत 6 बाद केवळ 159 धावा करू शकला. 

मार्क वुडने रचला इतिहास 
मात्र किवी संघाच्या डावाच्या सहाव्या षटकातील अखेरचा चेंडू टाकून इंग्लिश गोलंदाज मार्क वुडने इतिहास रचला. वुडने त्याच्या पहिल्या षटकातील अखेरचा चेंडू 155 किमी प्रति ताशी वेगाने टाकला आणि त्याचा हा चेंडू 2022 च्या टी-20 विश्वचषकातील सर्वात वेगवान चेंडू ठरला. त्याचा चेंडू इतका वेगवान होता की फलंदाज ग्लेन फिलिप्सची बॅट खूप उशिरा खाली आली आणि चेंडू बॅटला स्पर्श करून सीमारेषेच्या पलीकडे गेला. 

वुडच्या आधी या स्पर्धेतील सर्वात वेगवान चेंडूचा विक्रम एनरिक नॉर्खियाच्या नावावर होता. नॉर्खियाने हा चेंडू ताशी 153 किमी वेगाने टाकला होता. नॉर्खियाच्या पाठोपाठ न्यूझीलंडच्या लॉकी फर्ग्युसनचा नंबर लागतो, त्याने 151 किमी प्रतिताशी वेगाने गोलंदाजी केली होती. मात्र आता मार्क वुडने या दोघांनाही मागे टाकले असून आता मार्क वुडचा हा विक्रम कोण मोडणार हे पाहण्याजोगे असेल. 

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये चुरस 
इंग्लंडच्या गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन करून संघाला विजय मिळवून दिला. ख्रिस वोक्स आणि सॅम करण यांनी सर्वाधिक 2-2 बळी पटकावले. तर बेन स्टोक्स आणि मार्क वुड यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले. लक्षणीय बाब म्हणजे इंग्लंडच्या विजयामुळे यजमान ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा झटका बसला आहे. कारण इंग्लिश संघ आता 5 गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहचला आहे. खरं तर अव्वल स्थानी असलेल्या न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघाचे समान 5 गुण आहेत. मात्र किवी संघाचा नेटरनरेट चांगला आहे. ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी अखेरच्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. ऑस्ट्रेलियाचा पुढचा सामना 4 तारखेला अफगाणिस्तानसोबत होणार आहे, तर इंग्लंडचा पुढचा सामना 5 तारखेला श्रीलंकेसोबत होणार आहे.  

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: ENG vs NZ Mark Wood sets record for fastest bowler in World Cup 2022 with 155 per hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.