Pakistan Bowlers record, ENG vs PAK 1st Test: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना आज चौथ्या दिवशी भलताच चर्चेत आला. इंग्लिश फलंदाज हॅरी ब्रूक आणि जो रूट या दोघांनी केलेल्या तुफानी खेळीने साऱ्यांनाच अवाक् केले. जो रूट आणि हॅरी ब्रूक या दोघांनी चौथ्या विकेटसाठी तब्बल ४५४ धावांची भागीदारी केली. गेल्या काही महिन्यांपासून तुफान फॉर्मात असलेल्या जो रूट या डावातही अप्रतिम खेळी केली. त्याने १७ चौकारांच्या मदतीने २६२ धावांची मोठी खेळी. दुसरीकडे हॅरी ब्रूकने २९ चौकार आणि ३ षटकारांच्या साथीने ३१७ धावांची दमदार खेळी केली. या दोघांच्या मोठ्या खेळींच्या जोरावर इंग्लंडने ७ बाद ८२३ धावसंख्येवर डाव घोषित केला. या डावात पाकिस्तानच्या गोलंदाजांच्या नावे एक अतिशय लाजिरवाणी कामगिरी नोंदवण्यात आली.
सहा गोलंदाजांनी दिल्या १००हून अधिक धावा
पाकिस्तानच्या गोलंदाजांचा चमू हा जगातील भेदक मारा करणारा चमू म्हणून ओळखला जातो. पण आज इंग्लंडच्या रूट-ब्रूक जोडीने यजमानांच्या गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ५५६ धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी सपाट खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेत ८०० पार मजल मारली. पाकिस्तानच्या ६ गोलंदाजांनी शतकापेक्षाही जास्त धावा दिल्या. शाहीन शाह आफ्रिदीने २६ षटकात १२०, सइम अयूबने १४ षटकात १०१, सलमान अली आघाने १८ षटकात ११८ तर आमिर जमालने २४ षटकात १२६ धावा दिल्या. याव्यतिरिक्त नसीम शाहने गोलंदाजीत दीडशेपार मजल मारली. त्याने ३१ षटकात १५७ धावा दिल्या. तर अबरार अहमद तर द्विशतक गाठायच्या जवळ पोहोचला. त्याने ३५ षटकात १७४ धावा दिल्या.
दरम्यान, पहिल्या डावात कर्णधार शान मसूदचे दीडशतक (१५१), सलमान अली आगा (१०४) आणि सलामीवीर अब्दुल्ला शफीक (१०२) यांची शतके याच्या जोरावर पाकिस्तानने ५५६ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडकडून सलामीवीर झॅक क्रॉलीने ७८ तर बेन डकेटने ८४ धावांची खेळी केली. या दोघांना शतकाने हुलकावणी दिली असली तरी जो रूट आणि हॅरी ब्रूक या दोघांनी सगळी कसर भरून काढली. हॅरी ब्रूकच्या ३१७ आणि जो रूटच्या २६२ धावांच्या जोरावर इंग्लंडने ७ बाद ८२३ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर दुसऱ्या डावात दीडशतकी धावसंख्या गाठण्याआधीच पहिले सहा महत्त्वाचे फलंदाज गमावले.