ENG vs PAK 4th T20 Match : देश असो की मग विदेश पाकिस्तानच्या पराभवाची मालिका कायम आहे. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी संघाला ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या तोंडावर ०-२ असा दारूण पराभव पत्करावा लागला. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली गेली. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर यजमान इंग्लंडने दुसरा सामना जिंकला. मग तिसरा सामन्यात देखील पावसाची बॅटिंग पाहायला मिळाली. पण, चौथ्या सामन्यात विजय मिळवून यजमानांनी आपला दबदबा कायम ठेवला. गुरुवारी झालेल्या निर्णायक सामन्यात इंग्लिश संघाने ७ गडी आणि २७ चेंडू राखून मोठा विजय मिळवला.
खरे तर इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत शेजाऱ्यांनी त्यांचा विश्वचषकाचा संघ उतरवला होता. यष्टीरक्षक म्हणून आझम खानला संधी मिळाली होती, पण त्याच्या खराब क्षेत्ररक्षणाचा पाकिस्तानला चांगलाच फटका बसला. आझमने दोन सोपे झेल सोडून इंग्लिश संघाला मदत केली. डिसेंबर २०२१ पासून पाकिस्तानला आयर्लंड वगळता एकही द्विपक्षीय मालिका जिंकता आली नाही.
तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना नेहमीप्रमाणे पाकिस्तानने संथ गतीने धावा केल्या. यावेळी शेजाऱ्यांना निर्धारित २० षटके देखील खेळता आली नाहीत आणि संघ १९.५ षटकांत अवघ्या १५७ धावांवर गारद झाला. मोहम्मद रिझवान (२३), बाबर आझम (३६), उस्मान खान (३८) आणि इफ्तिखार अहमदने (२१) धावा करून १५० पार धावसंख्या पोहोचवली. इंग्लिश गोलंदाजांनी सांघिक कामगिरी करताना मार्क वुड (२), लियाम लिव्हिंगस्टोन (२), आदिल राशिद (२), जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन आणि मोईन अलीला (१) बळी घेण्यात यश आले.
शेजाऱ्यांचा ०-२ ने दारूण पराभव
पाकिस्तानने दिलेल्या १५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने सहज विजय साकारला. अवघ्या १५.३ षटकांत १५८ धावा करून यजमानांनी २-० ने मालिका खिशात घातली. फिल साल्टने २४ चेंडूत ४५ धावांची स्फोटक खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तर कर्णधार जोस बटलरने ३९ धावा केल्या. इंग्लिश फलंदाजांनी अखेरच्या सामन्यात देखील पाकिस्तानी गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. हारिस रौफला सर्वाधिक (३) बळी घेता आले, पण त्याने त्याच्या ३.३ षटकांत ३८ धावा दिल्या. शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद आमिर आणि नसीम शाह यांच्या हाती एकही शिकार लागली नाही. किंबहुना त्यांची निर्णायक सामन्यातही लाज गेली.
Web Title: ENG vs PAK 4th T20 Match England beat Pakistan in the 4th match by 7 wickets and 27 balls to spare and win the series 2-0
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.