Azam Khan Pakistan Keeper : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानला चार सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत ०-२ असा दारूण पराभव पत्करावा लागला. पावसामुळे या मालिकेतील दोन सामने रद्द करावे लागले. गुरुवारी झालेल्या निर्णायक सामन्यात मोठा विजय मिळवून इंग्लिश संघाने शेजाऱ्यांना पराभवाची धूळ चारली. या सामन्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. फिटनेसमुळे ट्रोल होणाऱ्या आझम खानने त्याच्या खराब क्षेत्ररक्षणाने पुन्हा एकदा टीकाकारांना आमंत्रण दिले. (ENG vs PAK 4th T20 Match)
इंग्लिश खेळपट्टीवर हारिस रौफ वगळता एकाही पाकिस्तानी गोलंदाजाला बळी घेता आला नाही. पण, हारिसला यष्टीरक्षक आझम खानने म्हणावी तशी साथ दिली नाही. त्याने दोन सोपे झेल सोडून यजमानांना मदत केली. हारिस रौफच्या गोलंदाजीवर प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार जोस बटलरचा यष्टीरक्षकाने सोपा झेल सोडला. हे पाहताच हारिस रौफने एकच संताप व्यक्त केला. या झेलचा दाखला देत चाहते आझमला बेक्कार ट्रोल करत आहेत. हारिस रौफचे हावभाव सर्वकाही सांगत आहेत.
तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना नेहमीप्रमाणे पाकिस्तानने संथ गतीने धावा केल्या. यावेळी शेजाऱ्यांना निर्धारित २० षटके देखील खेळता आली नाहीत आणि संघ १९.५ षटकांत अवघ्या १५७ धावांवर गारद झाला. मोहम्मद रिझवान (२३), बाबर आझम (३६), उस्मान खान (३८) आणि इफ्तिखार अहमदने (२१) धावा करून १५० पार धावसंख्या पोहोचवली. इंग्लिश गोलंदाजांनी सांघिक कामगिरी करताना मार्क वुड (२), लियाम लिव्हिंगस्टोन (२), आदिल राशिद (२), जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन आणि मोईन अलीला (१) बळी घेण्यात यश आले.
शेजाऱ्यांचा ०-२ ने दारूण पराभव
पाकिस्तानने दिलेल्या १५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने सहज विजय साकारला. अवघ्या १५.३ षटकांत १५८ धावा करून यजमानांनी २-० ने मालिका खिशात घातली. फिल साल्टने २४ चेंडूत ४५ धावांची स्फोटक खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तर कर्णधार जोस बटलरने ३९ धावा केल्या. इंग्लिश फलंदाजांनी अखेरच्या सामन्यात देखील पाकिस्तानी गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. हारिस रौफला सर्वाधिक (३) बळी घेता आले, पण त्याने त्याच्या ३.३ षटकांत ३८ धावा दिल्या. शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद आमिर आणि नसीम शाह यांच्या हाती एकही शिकार लागली नाही. किंबहुना त्यांची निर्णायक सामन्यातही लाज गेली.
Web Title: ENG vs PAK 4th T20 Match Pakistan wicket keeper Azam Khan dropped an easy catch off the bowling of Haris Rauf, watch video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.