मेलबर्न : आज मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तान आणि इंग्लंड (ENG vs PAK) यांच्यात किताबासाठी लढत होत आहे. खरं तर आयसीसीला आज आणखी एक असा चॅम्पियन संघ मिळेल, ज्याने या स्पर्धेत दोनवेळा विश्वचषक जिंकला आहे. यापूर्वी केवळ वेस्ट इंडिजच्या संघाने दोनवेळा हा किताब पटकावला आहे. आजच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १३७ धावा केल्या. इंग्लंडला टी-२० विश्वचषकाचा नवा चॅम्पियन होण्यासाठी १३८ धावांची आवश्यकता आहे.
प्रत्युत्तरात पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लिश संघाची सुरूवात निराशाजनक झाली. भारताविरूद्ध ताबडतोब खेळी करून रोहित सेनेला घाम फोडणारा ॲलेक्स हेल्स दुसऱ्याच चेंडूत तंबूत परतला. पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदीने हेल्सचा त्रिफळा उडवून इंग्लिश संघाला पहिला झटका दिला. १३.२ षटकांपर्यंत इंग्लंडची धावसंख्या ४ बाद ८८ एवढी आहे. आतापर्यंत पाकिस्तानी गोलंदाजांनी शानदार कामगिरी करून इंग्लिश संघावर दबाव टाकला आहे. हारिस रौफने सर्वाधिक २ बळी पटकावून शेजाऱ्यांच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. तर शाहिन आफ्रिदी आणि शादाब खान यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले आहे.
पाकिस्तानचे फलंदाज अयशस्वीपाकिस्तानी संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत केवळ १३७ धावा केल्या आहेत. यामध्ये ८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. पाकिस्तानकडून शान मसूदने सर्वाधिक ३८ धावांची खेळी केली. त्याच्या पाठोपाठ कर्णधार बाबर आझम ३२ धावांची साजेशी खेळी केली. तर शादाब खानने २० धावा करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र या तिघांशिवाय कोणत्याच पाकिस्तानी फलंदाजाला २० धावांचा आकडा गाठता आला नाही. सॅम करनने सर्वाधिक ३ बळी पटकावून पाकिस्तानला मोठे झटके दिले. आदिल राशिद आणि ख्रिस जॉर्डन यांना प्रत्येकी २-२ बळी घेण्यात यश आले. तर बेन स्टोक्सला १ बळी घेण्यात यश आले.
आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ -बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम, शाहिन शाह आफ्रिदी, नसीम शाह, हारिस रौफ.
आजच्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ -जोस बटलर (कर्णधार), ॲलेक्स हेल्स, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल राशिद.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"