England vs Pakistan 1st ODI : वन डे मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी ७ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे इंग्लंडला आयत्या क्षणी नवा संघ जाहीर करावा लागला. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली ९ नव्या खेळाडूंना इंग्लंड क्रिकेट बोर्डानं ( ECB) संधी दिली आणि त्यापैकी पाच खेळाडूंनी आज पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या वन डे त पदार्पण केले. इंग्लंडच्या या B टीमने कमालच केली. साकिब महमूदनं पहिल्या स्पेलमध्ये धमाकेदार कामगिरी करताना ५ षटकांत २७ धावांत ३ विकेट्स घेतल्या. साकिबनं तब्बल १८ चेंडू निर्धाव फेकले. त्यानं पहिल्या षटकाच्या तीन चेंडूंत पाकिस्तानचे दोन मोठे फलंदाज भोपळ्यावर तंबूत पाठवले.
इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. झॅक क्रॅवली, ब्रायडन कार्स, लुईस ग्रेगोरी, फिल सॉल्ट व जॉन सिम्पसन यांना आज पदार्पणाची संधी मिळाली. साकिबनं पहिल्याच चेंडूवर इमाम-उल-हकला पायचीत करून माघारी पाठवले. त्यानंतर कर्णधार बाबर आजम मैदानावर आला. त्यानं पहिला चेंडू खेळून काढला, परंतु दुसऱ्याच चेंडूवर स्लीपमध्ये उभ्या असलेल्या झॅककरवी झेलबाद झाला. वन डे क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या बाबरचा अपयशाचा पाढा इथेही कायम राहिला. फखर झमान व मोहम्मद रिझवान यांनी संघर्ष दाखवला, परंतु ग्रेगोरीनं रिझवानला बाद केले. सौद शकीलला पायचीत करून साकिबनं पाकिस्तानला चौथा धक्का दिला. पाकिस्तानचे ४ फलंदाज २६ धावांत माघारी परतले.