Join us  

इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंची सुरक्षा वाढवली; PCB च्या मागणीनंतर निर्णय, जाणून घ्या कारण

पाकिस्तानी खेळाडूंना इंग्लंड क्रिकेट बोर्डाने अतिरिक्त सुरक्षा पुरवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 2:05 PM

Open in App

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी खेळाडूंना इंग्लंड क्रिकेट बोर्डाने अतिरिक्त सुरक्षा पुरवली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केलेल्या मागणीनंतर दोन सुरक्षारक्षक खेळाडूंसोबत असणार आहेत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा चाहत्यासोबत झालेला वाद ताजा असताना इंग्लिश बोर्डाने हा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघातील खेळाडू फावल्या वेळात हॉटेल अथवा बाहेर कुठे गेल्यास त्यांच्यासोबत अतिरिक्त सुरक्षारक्षक असतील, अशी माहिती पाकिस्तानातील 'जियो न्यूज' या वृत्तसंस्थेने दिली. 

अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये बाबर आझम एका चाहत्याशी वाद  घालताना दिसत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडे अतिरिक्त सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. चार  सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रद्द झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात यजमान इंग्लंडने विजय मिळवला. मग मंगळवारी होणारा तिसरा सामना देखील रद्द झाला. त्यामुळे पाकिस्तानची चांगलीच डोकेदुखी वाढली. आता अखेरचा सामना जिंकून मालिका बरोबरीत संपवण्याचे आव्हान शेजाऱ्यांसमोर आहे. 

एकच सामना झाला अन् इंग्लंडची आघाडी आतापर्यंत केवळ एक सामना खेळवला गेला, तर दोन सामने पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करावे लागले. दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मग आव्हानाचा पाठलाग करताना पाहुण्या पाकिस्तानला घाम फुटला अन् २३ धावांनी पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने निर्धारित २० षटकांत ७ बाद १८३ धावा केल्या. कर्णधार जोस बटलरने सर्वाधिक धावा करताना ५१ चेंडूत ८४ धावा कुटल्या. त्याने ३ षटकार आणि ८ चौकार लगावले. त्याच्याशिवाय विल जॅक्सने ३७ धावांची खेळी केली. इंग्लंडने दिलेल्या १८४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला नेहमीप्रमाणे संथ खेळीचा फटका बसला. कर्णधार बाबर आझमने २६ चेंडूत ३२ धावा केल्या, मग फखर झमानने २१ चेंडूत ४५ धावा करून सामन्यात रंगत आणली. पण, इंग्लंडच्या घातक गोलंदाजीसमोर पाकिस्तान निर्धारित २० षटके देखील खेळू शकला नाही. अखेर पाहुण्या संघाने १९.२ षटकांत सर्वबाद केवळ १६० धावा केल्या आणि सामना २३ धावांनी गमावला. 

टॅग्स :पाकिस्तानइंग्लंडटी-20 क्रिकेटबाबर आजम