ENG vs PAK T20 Series : ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या तोंडावर पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. बुधवारपासून या मालिकेला सुरुवात होत आहे. पण, सलामीच्या सामन्यापूर्वी शेजाऱ्यांची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली. कारण संघाचा वेगवान गोलंदाज हसन अली संपूर्ण मालिकेला मुकणार आहे. पाकिस्तानच्या संघ व्यवस्थापनाने हसन अलीचा काउंटी क्रिकेटमधील त्याचा करार कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला या मालिकेसाठी हारिस रौफचा पर्याय म्हणून अलीकडे पाहिले जात होते. रौफ दुखापतीमुळे या मालिकेचा हिस्सा नाही.
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील ही मालिका दोन्हीही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण ही मालिका संपताच ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगेल. यामुळेच पाकिस्तान आणि इंग्लंड यांचे विश्वचषकात सराव सामने होणार नाहीत. ट्वेंटी-२० मालिका हाच त्यांचा विश्वचषकासाठी सराव असेल. पाकिस्तानने अद्याप ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला नाही. आयर्लंड आणि इंग्लंडविरूद्धच्या मालिकांसाठी जाहीर झालेल्या संघापैकी १५ खेळाडू विश्वचषक खेळतील हे निश्चित आहे. बाबर आझमच्या नेतृत्वात पुन्हा एकदा शेजारी मोठ्या व्यासपीठावर खेळणार आहेत.
हारिस रौफ क्रिकेटपासून दूरदरम्यान, विश्वचषकासाठी संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख २५ मे आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात पाकिस्तानचा संघ जाहीर होईल. हारिस रौफ दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे, त्यामुळे तो पुनरागमन करतो का हे पाहण्याजोगे असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा परतलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर विश्वचषकात दिसेल यात शंका नाही.
इंग्लंडविरूद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ - बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, सैम अयुब, फखर जमान, इरफान खान नियाझी, इफ्तिखार अहमद, उस्मान खान, आझम खान, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद आमिर, नसीम शाह, हारिस रौफ, अब्बास आफ्रिदी, अबरार अहमद, सलमान अली आगा.
पाकिस्तानचा इंग्लंड दौरा २२ मे - पहिला ट्वेंटी-२० सामना २५ मे - दुसरा ट्वेंटी-२० सामना२८ मे - तिसरा ट्वेंटी-२० सामना ३० मे - चौथा ट्वेंटी-२० सामना