ENG vs PAK T20 Series News : ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या तोंडावर पाकिस्तानी संघाला इंग्लंडकडून दारूण पराभव पत्करावा लागला. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या शेजाऱ्यांना एकही सामना जिंकता आला नाही. चार सामन्यांच्या मालिकेतील केवळ दोन सामने खेळवले गेले. पावसाच्या व्यत्ययामुळे दोन सामने रद्द करावे लागले. गुरुवारी झालेला अखेरचा सामना जिंकून यजमान इंग्लिश संघाने मालिका २-० ने खिशात घातली. या पराभवासह पाकिस्तानने आपल्या पराभवाची मालिका कायम ठेवल्याचे दिसते. खरे तर डिसेंबर २०२१ पासून पाकिस्तानने आयर्लंड वगळता एकही द्विपक्षीय मालिका जिंकली नाही.
आपल्या संघाच्या दारूण पराभवानंतर शोएब मलिकने खेळाडूंचे मनोबल वाढवले. पराभवानंतर खचून न जाता नवी उभारी घ्यायला हवी असे मलिकने नमूद केले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत शोएब मलिक म्हणाला की, आपल्यासाठी ही कठीण मालिका होती. पण लक्षात ठेवा आम्ही या आधी अशा प्रसंगाचा सामना केला आहे. मात्र यातून संघ अधिक मजबूत बनत असतो. बाबर आझमने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला हवी. स्ट्राईक रोटेट करण्याठी आम्हाला मधल्या षटकांमध्ये कोणीतरी हवे आहे. तो आमचा सर्वोत्तम पर्याय आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली आमची मधली फळी खूप चांगली कामगिरी करेल. आझम खान आणि शादाब खान हे संघाचे महत्त्वाचे शिलेदार आहेत. या पराभवाने आत्मविश्वास गमावू नका, मनापासून खेळा, तुम्ही मॅच विनर आहात. विश्वचषकात खेळताना तुमचे मनोबल चांगले ठेवा.
इंग्लंडचा दबदबा कायमइंग्लंडविरूद्धच्या चौथ्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना नेहमीप्रमाणे पाकिस्तानने संथ गतीने धावा केल्या. यावेळी शेजाऱ्यांना निर्धारित २० षटके देखील खेळता आली नाहीत आणि संघ १९.५ षटकांत अवघ्या १५७ धावांवर गारद झाला. पाकिस्तानने दिलेल्या १५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने सहज विजय साकारला. अवघ्या १५.३ षटकांत १५८ धावा करून यजमानांनी २-० ने मालिका खिशात घातली. फिल साल्टने २४ चेंडूत ४५ धावांची स्फोटक खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तर कर्णधार जोस बटलरने ३९ धावा केल्या.