पाकिस्तानी संघ इंग्लंड दौऱ्यावर असून, तिथे चार सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. पहिला सामना रद्द झाला तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानच्या फिरकीपटूंचा खराब फॉर्म कायम असून, त्याचा फटका संघाला बसत आहे. दुसऱ्या सामन्यात फिरकीपटू शादाब खानने ४ षटकांत तब्बल ५५ धावा दिल्या आणि त्याला एकही बळी घेता आला नाही. शादाबच्या खराब कामगिरीनंतर माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीने त्याच्याशी संवाद साधला.
स्थानिक चॅनेलवर बोलताना आफ्रिदीने सांगितले की, शादाबचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मी त्याच्याशी फोनवरून चर्चा केली. जेव्हा जेव्हा पाकिस्तानने गोलंदाजी चांगली केली आहे तेव्हा संघाने विजय मिळवला आहे. मी पाकिस्तानचे सर्व सामने पाहिले आहेत. मी शादाबशी बोलताना त्याला कठीण काळ जाईल असे सांगत धीर दिला. मला कल्पना आहे की, शादाब खानवर अतिरिक्त दबाव आहे. कारण तो एक मोठा खेळाडू आहे. त्याने मला काही समस्या सांगितल्या असून, मी त्याला काही सल्ले दिले आहेत ज्यावर तो काम करत आहे. मला आशा आहे तो पुढच्या सामन्यात चांगली कामगिरी करेल.
पाकिस्तानचा पराभव अन् इंग्लंडची आघाडीदरम्यान, दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मग आव्हानाचा पाठलाग करताना पाहुण्या पाकिस्तानला घाम फुटला अन् २३ धावांनी पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने निर्धारित २० षटकांत ७ बाद १८३ धावा केल्या. कर्णधार जोस बटलरने सर्वाधिक धावा करताना ५१ चेंडूत ८४ धावा कुटल्या. त्याने ३ षटकार आणि ८ चौकार लगावले. त्याच्याशिवाय विल जॅक्सने ३७ धावांची खेळी केली. इंग्लंडने दिलेल्या १८४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला नेहमीप्रमाणे संथ खेळीचा फटका बसला. कर्णधार बाबर आझमने २६ चेंडूत ३२ धावा केल्या, मग फखर झमानने २१ चेंडूत ४५ धावा करून सामन्यात रंगत आणली. पण, इंग्लंडच्या घातक गोलंदाजीसमोर पाकिस्तान निर्धारित २० षटके देखील खेळू शकला नाही. अखेर पाहुण्या संघाने १९.२ षटकांत सर्वबाद केवळ १६० धावा केल्या आणि सामना २३ धावांनी गमावला.