रावळपिंडी कसोटी सामन्यात पाकिस्तानलाइंग्लंडविरुद्ध 74 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडच्या संघासाठी हा ऐतिहासिक क्षण होता कारण 22 वर्षांनंतर पाकिस्तानी भूमीवर कसोटी सामना जिंकण्यात त्यांना यश मिळाले. यापूर्वी 2000 साली कराची कसोटी सामन्यात इंग्लंडने शेवटचा विजय मिळवला होता. त्यावेळी इंग्लंडने तो सामना सहा गडी राखून जिंकला होता.
पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियानं पाकिस्तानच्या कामगिरीनंतर कर्णधार बाबर आझम आणि पीसीबी प्रमुख रमीझ राजा यांच्यावर हल्लाबोल केला. आता आमचं मॅनेजमेंट, बाबर आझम आणि पीसीबी प्रमुख एकच बोलतील की इंग्लंडनं चांगली कामगिरी केली आणि आम्हाला त्यांच्याकडून शिकायला हवं. तर शिका की? तुम्ही कधी शिकणार?, असा सवाल त्यानं केला आहे. त्यानं आपल्या युट्यूब चॅनलवरून एक व्हिडीओ शेअर केलाय.
आता शाहीन आफ्रिदीला दोष देणार
आथा पाकिस्तानी टीम मॅनेजमेंट या पराभवासाठी शाहीन शाह आफ्रिदीच्या अनुपस्थितीला जबाबदार धरू शकतातय. जर तो उपलब्ध नाही, तर बाकीचे काय लोणचं विकायला आलेले? गेम प्लॅनिंग, रणनिती, रिव्हर्स स्विंग कुठे आहे? असं तो म्हणाला.
दानिश कनेरिया म्हणाला की, 'पाकिस्तानने बेन स्टोक्स आणि ब्रेंडन मॅक्युलम यांच्याकडून शिकले पाहिजे. आम्ही फक्त पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पुनरुज्जीवनाबद्दल बोलतो. दिवसभर तेच सुरू असतं की पाकिस्तानचा संघ हतबल होता. बाबर आझमने बेन स्टोक्सच्या कॅप्टनसीमधून धडा घ्यावा. जगभरातील प्रशिक्षकांनीही ब्रेंडन मॅक्युलमकडून शिकायला हवे. त्यांचा संघ पराभवाची भीती नाही पण आमच्या संघाला आहे.’