England vs South Africa 1st T20I : जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) याला रोखणे अवघडच झाले आहे. डेवीड मलाननेही चांगली फटकेबाजी केली. पण, सप्राईज पॅकेज ठरला तो मोईन अली ( Moeen Ali). त्याने इंग्लंडकडून ट्वेंटी-२०त सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला. दक्षिण आफ्रिकेकडूनही चांगला खेळ पाहायला मिळाला, परंतु ४१ धावांनी त्यांना पराभव पत्करावा लागला. २१ वर्षीय त्रिस्तान स्टुब्ब्सने ( Tristan Stubbs ) या सामन्यात विक्रमी खेळी केली.
कर्णधार जोस बटलर ( २२) याने ७ चेंडूंत वादळी खेळी करून तंबूची वाट धरली. डेवीड मलान व बेअरस्टो यांनी २ बाद ४१ वरून संघाची धावसंख्या ११२ धावांपर्यंत पोहोचवली. मलान २३ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह ४३ धावांवर माघारी परतला. मोईन अलीने धावांचा पाऊस पाडला. अली व बेअरस्टो यांनी ११६ धावांची भागीदारी केली. अलीने १८ चेंडूत २ चौकार व ६ षटकार खेचून ५२ धावांची खेळी केली. बेअरस्टो ५३ चेंडूंत ३ चौकार व ८ षटकारांसह ९० धावांवर माघारी परतला.
इंग्लंडने ६ बाद २३४ धावा केल्या. मोईन अली हा इंग्लंडकडून ट्वेंटी-२०त सर्वात वेगवान अर्धशतक करणारा फलंदाज ठरला. त्याने आज १६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना लिएम लिव्हिंगस्टोन ( १७ चेंडू वि. पाकिस्तान, २०२१)चा विक्रम मोडला.
प्रत्युत्तरात, क्विंटन डी कॉक ( २) व रिली रोसोवू ( ४) यांना रिसे टॉप्लीने माघारी पाठवले. रिझा हेड्रीक्स व हेनरीच क्लासेन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु आदिल राशिदने धक्के दिले. क्लासेन ( २०) व कर्णधार डेव्हिड मिलर ( ८) यांना राशिदने बाद केले. हेंड्रिक्स व त्रिस्तान स्टुब्ब्सने ४० धावांची भागीदारी केली. हेंड्रीक्स ५७ धावांवर बाद झाला. चार महिन्यांपूर्वी
मुंबई इंडियन्सकडून आयपीएल २०२२ मध्ये पदार्पण करणाऱ्या त्रिस्तानने आज वादळी खेळी केली. त्याने २८ चेंडूंत २ चौकार व ८ षटकारांच्या मदतीने ७२ धावा चोपल्या. अँडील फेलुक्वायोने २२ धावा केल्या, परंतु आफ्रिकेला ८ बाद १९३ धावांपर्यंतच मजर मारता आली. रिचर्ड ग्लीसनने तीन, टॉप्लीने दोन व राशिदने दोन विकेट्स घेतल्या.
- या सामन्यात एकूण २९ षटकार खेचले गेले आणि इंग्लंडमध्ये झालेल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ही सर्वोत्तम षटकारांची आतषबाजी ठरली. यापूर्वी २०२१मध्ये इंग्लंड वि. पाकिस्तान सामन्यात २७ षटकार खेचले गेले होते.
- ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये आफ्रिकेकडून सर्वात जलद अर्धशतकांच्या विक्रमात त्रिस्तानने ( १९ चेंडू) आज दुसरे स्थान पटकावले. त्याने एबी डिव्हिडिलियर्सचा ( २१ वि. इंग्लंड, २०१६ ) विक्रम मोडला. क्विंटन डी कॉक या विक्रमात ( १७ चेंडू वि. इंग्लंड, २०२०) आघाडीवर आहे.
- आफ्रिकेकडून ट्वेंटी-२०त अर्धशतक झळकावणाऱ्या युवा फलंदाजाचा मान त्रिस्तानने पटकावला. तो २१ वर्ष व ३४७ दिवसांचा आहे. यापूर्वी क्विंटन डी कॉकने २०१६मध्ये इंग्लंडविरुद्ध २३ वर्ष व ९२ दिवसांचा असताना हा पराक्रम केला होता. सहाव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमावर येऊन आफ्रिकेसाठी सर्वाधिक ८ षटकारांचा विक्रमही त्रिस्तानने नावावर केला.
Web Title: ENG vs SA 1st T20I : England beat South Africa by 41 runs, Tristan Stubbs became a Youngest to score a T20I fifty for South Africa, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.