Joe Root Records, ENG vs SL 2nd Test: इंग्लंडचा फलंदाज जो रूट आजकाल जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा कसोटी क्रिकेटमधील काही ना काही विक्रम मोडीत काढतो. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा सर्वात मोठा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर असला, तरी जो रूटने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. जो रूटने श्रीलंकेविरुद्ध लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावली. पहिल्या डावात १४३ आणि दुसऱ्या डावात १०३ अशा एकाच सामन्यात रूटने एकूण २४६ धावा केल्या. जो रूटने सचिन तेंडुलकरसह जगातील ६ महान क्रिकेटपटूंना मागे टाकले असून कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे.
आपल्या संघाला विजयी करताना सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जो रूट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने तब्बल ६ फलंदाजांना मागे टाकले आहे. जो रूटने ऑस्ट्रेलियाचा माजी महान फलंदाज स्टीव्ह वॉला मागे टाकले. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये विजयी कारणांसाठी ६४६० धावा केल्या होत्या. जो रूटच्या नावे आता संघाच्या विजयात ६५७१ धावा आहेत. या यादीत अव्वल स्थानावर ऑस्ट्रेलियाचा महान माजी कर्णधार रिकी पाँटिंग आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये विजयी खेळीत ९१५७ धावांचे योगदान दिले होते.
या यादीत चौथे नाव दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसचे आहे. जॅक कॅलिसने कसोटी क्रिकेटमध्ये संघाच्या विजयात ६३७९ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन पाचव्या स्थानावर आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये विजयात ६१५४ धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकर यादीत सहाव्या स्थानी असून त्याने ५९४६ धावा केल्या आहेत. सातव्या क्रमांकावर स्टीव्ह स्मिथ ५६९० धावांसह तर आठव्या क्रमांकावर इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुक ५६८९ धावांसह आहे. जो रूटने एकाच सामन्यात या ६ दिग्गजांना मागे टाकत मोठा पल्ला गाठला.
सुनील गावसकर-ब्रायन लाराच्या विक्रमाशी बरोबरी
जो रूटने दोन्ही डावात शतक ठोकून अनेक दिग्गज खेळाडूंशी बरोबरी साधली. जो रूटने दोन शतकांसह कसोटी क्रिकेटमध्ये ३४ शतकांचा टप्पा पार केला. त्यासोबतच जो रूटने श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने, विंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा, भारताचा माजी कर्णधार सुनील गावसकर, पाकिस्तानचा माजी कर्णधार यूनिस खान या चार दिग्गज क्रिकेटपटूंच्या कसोटी शतकांशी बरोबरी केली. महत्त्वाची बाब म्हणजे हे चारही खेळाडू निवृत्त झाले आहेत. जो रूट मात्र अजून खेळणार असल्याने तो लवकरच यांच्या पुढे जाईल. तसेच या कसोटी मालिकेत त्याला राहुल द्रविडच्या (३६ कसोटी शतके) कामगिरीशी बरोबरी करण्याची संधी आहे.
श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा संघ २-० ने आघाडीवर आहे. तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना ६ ते १० सप्टेंबर दरम्यान खेळला जाणार आहे.
Web Title: ENG vs SL 2nd Test Joe Root scores centuries in both innings breaks Sachin Tendulkar record equals Sunil Gavaskar Brian Lara
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.