Joe Root Century, ENG vs SL Test: इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना लंडनच्या लॉर्ड्स स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो रूटने त्याच्या निर्णयाचा पुरेपूर वापर करत श्रीलंकेच्या गोलंदाजांना चोप दिला. या सामन्याच्या पहिल्या डावात जो रूटने शतक झळकावले. हे शतक त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खास शतक ठरले. या शतकासह त्याने काही खास विक्रम आपल्या नावावर केले तसेच भारतीय कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) मागे टाकले.
जो रूटचे विक्रमी शतक
सामन्यात इंग्लंडची सुरुवात खूपच खराब झाली होती. पहिल्या तीन विकेट केवळ ८२ धावांत पडल्या. निम्मा संघही १९२ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. पण जो रुटने एका बाजूने डाव सांभाळत खेळ सुरु ठेवला आणि कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एक शतक पूर्ण केले. कसोटी कारकिर्दीतील हे त्याचे ३३वे शतक आहे. यासह त्याने कसोटी फॉरमॅटमध्ये इंग्लंडकडून सर्वाधिक शतके झळकावण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. रूटच्या आधी ॲलिस्टर कुकनेही इंग्लंडकडून कसोटीत ३३ शतके झळकावली होती.
रोहित शर्माला टाकलं मागे
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके झळकावण्याच्या बाबतीत जो रूट आता सक्रिय खेळाडूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ४९ शतके ठोकली आहेत. त्याने रोहित शर्माला मागे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर ४८ शतके आहेत. सक्रिय खेळाडूंच्या यादीत विराट कोहली आघाडीवर आहे. त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८० शतके झळकावली आहेत.
जो रूटचा आणखीही एक खास विक्रम
जो रूट हा इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारा फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम ॲलिस्टर कुकच्या नावावर होता. ॲलिस्टर कुकने इंग्लंडमध्ये ६५६८ कसोटी धावा केल्या होत्या. जो रूटने हा आकडा पार केला. तसेच कसोटीत सर्वाधिक वेळा ५०+ धावा करून तो टॉप-५ मध्ये पोहोचला आहे. त्याने शिवनारायण चंद्रपॉलला मागे टाकले. जो रूटने कसोटीत ९७व्यांदा ५०+ धावा केल्या आहेत.
Web Title: ENG vs SL Test Joe Root century equals Alastair Cook record scoring most test centuries for England surpasses Rohit Sharma
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.