Virat Kohli vs Joe Root, WI vs ENG: इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट गेल्या काही महिन्यांपासून मोठी खेळण्यात सतत अपयशी ठरत होता. अखेर वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेत त्याने स्वत:ला चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर बढती दिली. त्या बदलाचा त्याला चांगलाच फायदा झाला. अँटिग्वा येथील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात १०९ धावांची शानदार खेळी केल्यानंतर, रुटने बार्बाडोस येथील दुसऱ्या कसोटीतही विक्रमी १५३ धावांची खेळी केली. जो रूटच्या या दमदार खेळीमुळे त्याने 'विराट' विक्रम करत किंग कोहलीचाच मागे टाकले.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रूटने संयमी खेळी करून दाखवली. त्याच्या दीडशतकामुळे इंग्लंडने पहिल्या डावात ९ बाद ५०७ अशी मोठी धावसंख्या उभारली. रूटला स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सच्या रूपाने साथ मिळाली. त्याने १२८ चेंडूत १२० धावांची झटपट खेळी केली. जो रूटने शानदार खेळी करत कारकिर्दीत १२व्यांदा दीडशतक ठोकलं आणि माजी कर्णधार अॅलिस्टर कूकला मागे टाकलं. त्याशिवाय, सध्या सक्रिय असलेल्या कसोटीपटूंमध्ये त्याने विराट कोहलीला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं.
याशिवाय, कर्णधार म्हणून त्याने ७व्यांदा दीडशे किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या. त्यामुळे तो या यादीत संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला. या यादीत मात्र विराट कोहली जो रूटपेक्षा पुढे आहे. विराटच्या नावावर कर्णधार म्हणून ९ दीडशतकं आहेत. तर डॉन ब्रॅडमन यांच्या नावे कर्णधार म्हणून ८ दीडशतकी खेळी आहेत.