ICC Womens T20 World Cup : महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील 'ब' गटात वेस्ट इंडिज महिला संघाने (West Indies Women) महिला टी-२० क्रिकेट जगतातील नंबर २ इंग्लंड महिला संघाला (England Women) पराभवाचा धक्का दिला. या सामन्यातील विजयासह वेस्ट इंडिज महिला संघाने यंदाच्या महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या हंगामातील उपांत्य फेरी गाठली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना इंग्लंड महिला संघाने निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात १४१ धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिज महिला संघानं १२ चेंडू आणि ६ विकेट्स राखून सामना खिशात घालत इंग्लंड महिला संघाला स्पर्धेतून बाद केले.
नंबर वन कामगिरीसह वेस्ट इंडिजनं गाठली उपांत्य फेरी
वेस्ट इंडिज महिला संघा विरुद्धच्या लढती आधी इंग्लंड महिला संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी होता. पण या पराभवामुळे धावगतीवर परिणाम झाला आणि ६ गुण खात्यात जमा करूनही या संघावर स्पर्धेतून बाद होण्याची नामुष्की ओढावली. वेस्ट इंडीजनं उत्तम धावगतीच्या जोरावर 'ब' गटात अव्वलस्थानावर झेप घेतली. त्यामुळे सेमीचा त्यांचा पेपर थोडा सोपाही झाला आहे. या गटातून दक्षिण आफ्रिका महिला संघाच्या रुपात दुसरा संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे.
समान गुण असूनही इंग्लंडचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या मागे राहिला
दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने ४ पैकी ३ सामन्यातील विजयासह ६ गुण कमावले. दुसऱीकडे इंग्लंडच्या संघानेही ४ सामन्यातील ३ सामन्यातील विजयासह ६ गुण कमावले. पण दक्षिण आफ्रिकेच्या (+१.३८२) धावगतीच्या तुलनेत इंग्लंडचा संघ (+१.३८२) मागे पडला. तिसऱ्या स्थानावर राहिल्यामुळे त्यांचा स्पर्धेतील प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला.
बॅटिंगवेळी इंग्लंडकडून फक्त एकटी लढली
पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडच्या आघाडीच्या बॅटर सपशेल अपयशी ठरल्या. नॅटली सायव्हर हिने ५० चेंडूत ५ चौकाराच्या मदतीने केलेल्या ५७ धावा केल्या. याशिवाय कर्णधार हिथर नाइट २१ (१३), वॅट हॉज १६(१२) आणि मैया बुशिए १४(१९) या बॅटर्संनी कसा बसा दुहेरी आकडा गाठला. अन्य बॅटरला हा आकडाही गाठता आला नाही. परिणामी इंग्लंडच्या संघाला १४१ धावांपर्यंतच मजल मारता आली. वेस्ट इंडिजकडून अफि फ्लेचर हिने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. २ विकेट्स घेत हेली मेथ्यूजनं तिला उत्तम साथ दिली. याशिवाय डिआंड्रा डॉटिन हिने आपल्या खात्यात एक विकेट जमा केल्याचे पाहायला मिळाले.
वेस्ट इंडिजच्या सलामी जोडीनं शतकी भागीदारीसह रचला विजयाचा भक्कम पाया
इंग्लंड महिला संघाने सेट केलेल्या टार्गेटचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाची कर्णधार हेली मॅथ्यूज हिने सलामीची बॅटर कियाना जोसेफच्या साथीनं संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी रचत इंग्लंडच्या महिला संघाला बॅकफूटवर ढकलले. हेली मॅथ्यूजनं ३८ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५० धावांची खेळी केली. कियाना जोसेफ हिने ३८ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ५२ धावांचे योगदान दिले. या दोघींशिवाय डिआंड्रा डॉटिन हिने १९ चेंडूत २ चौकार आणि २ षटकार मारत इंग्लंडच्या उरल्या सुरल्या आशाही संपुष्टात आणल्या.