अहमदाबाद : अक्षर पटेल व रविचंद्रन अश्विन जोडीच्या फिरकी जाळ्यात पाहुणा संघ पुन्हा अडकला. चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव पहिल्या दिवशी चहापानानंतर २०५ धावांत संपुष्टात आला. प्रत्युत्तरात खेळताना भारताने दिवसअखेर १ बाद २४ धावा केल्या होत्या. त्यावेळी रोहित शर्मा (८) व चेतेश्वर पुजारा (१५) खेळपट्टीवर होते. भारताने शुभमन गिलला डावाच्या तिसऱ्या चेंडूवर गमावले. त्याला जेम्स अँडरसनने पायचित केले. त्यावेळी भारताचे खातेही उघडले नव्हते.
या मैदानावर तिसऱ्या कसोटी सामन्यात ११२ व ८१ धावांत गारद झालेल्या इंग्लंडने गुरुवारी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला, पण बेन स्टोक्सचा (५५) अपवाद वगळता अन्य फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. खेळपट्टीवर चेंडू वळत होता आणि चेंडूला उसळीही मिळत होती; पण इंग्लंडच्या फलंदाजांनी जास्तीत जास्त विकेट आपल्या चुकीमुळे गमावल्या.
गेल्या कसोटीत ११ बळी घेणारा स्थानिक स्टार अक्षरने ६८ धावांच्या मोबदल्यात चार बळी घेतले, तर अश्विनने ४७ धावांत तीन बळी घेतले. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने दोन फलंदाजांना माघारी परतवले.
भारत मालिकेत २-१ ने आघाडीवर असून, विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला केवळ अनिर्णीत निकालाची गरज आहे. न्यूझीलंडने यापूर्वीच अंतिम फेरी गाठली आहे.
अक्षरने सकाळच्या सत्रात इंग्लंडला दोन धक्के दिले. उपाहारापर्यंत पाहुण्या संघाने ७४ धावांत तीन फलंदाज गमावले होते. डोम सिब्ले (२) व जॅक क्रॉली (८) यांना अक्षरने माघारी परतवले. सिराजने जो रुटचा (५) पायचित केले. पहिल्या तासात इंग्लंडची तीन बाद ३० अशी अवस्था होती. त्यानंतर स्टोक्सने १२१ चेंडूंना सामोरे जाताना ५ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ५५ धावा केल्या. त्याने अश्विन व वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर षटकार ठोकले. सुंदरने त्याला पायचित केले. जॉनी बेयरस्टॉ व स्टोक्स यांनी ४८ धावांची भागीदारी केली. बेयरस्टॉ (२८) सिराजचे लक्ष्य ठरला.
तळाच्या फळीतील फलंदाजांमध्ये डॅन लॉरेन्सने ४६ धावा केल्या; पण अक्षरच्या गोलंदाजीवर फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो यष्टिचित झाला. ओली पोप (२९), बेन फोक्स (१) व जॅक लीच (७) यांना अश्विनने तंबूचा मार्ग दाखविला.
आर्चर ‘आउट’
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर कोपराच्या दुखापतीमुळे भारताविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. बेन स्टोक्ससह संघातील काही अन्य सदस्यांच्या पोटात संक्रमण झाले आहे. इंग्लंड ॲण्ड वेल्स क्रिकेट बोर्डने गुरुवारी ही माहिती दिली.
धावफलक
इंग्लंड पहिला डाव : जॅक क्रॉली झे. सिराज गो. पटेल ९, डोम सिबली त्रि. गो. पटेल २, जॉनी बेयरे स्टॉ पायचित गो. सिराज २८, ज्यो रूट पायचित गो. सिराज ५, बेन स्टोक्स पायचित गो. सुंदर ५५, ओली पोप झे. गिल गो. अश्विन २९, डॅन लॉरेन्स यष्टिचित पंत गो. पटेल ४६, बेन फोक्स झे. रहाणे गो. अश्विन १, डॉम बेस पायचित गो. पटेल ३, जॅक लीच पायचित गो. अश्विन ७, जेम्स ॲन्डरसन नाबाद १०, अवांतर : १० एकूण : ७५.५ षटकात सर्वबाद २०५ धावा. गडी बाद क्रम : १/१०, २/१५, ३/३०, ४/७८, ५/१२१, ६/१६६, ७/१७०, ८/१८८, ९/१८९, १०/२०५. गोलंदाजी : ईशांत ९-२-२३-०, सिराज १४-२-४५-२, अक्षर पटेल २६-२-६८-४, अश्विन १९.५-४-४७-३, सुंदर ७-१-१४-१. भारत पहिला डाव : शुभमन गिल पायचित गो. ॲन्डरसन ००, रोहित शर्मा खेळत आहे ८, चेतेश्वर पुजारा खेळत आहे १५, अवांतर १, एकूण : १२ षटकात १ बाद २४ धावा. गडी बाद क्रम : १/०. गोलंदाजी : ॲन्डरसन ५-५-०-१, बेन स्टोक्स २-१-४-०, जॅक लीच ४-०-१६-०, डोम बेस १-०-४-०.
Web Title: England again caught in the spin trap
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.