Join us  

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरची विकेट काढल्यानंतर जीवे मारण्याची मिळाली होती धमकी; 'त्या' गोलंदाजाने आज केली निवृत्तीची घोषणा

सचिनला ९१ धावांवर बाद केल्यानंतर त्या गोलंदाजाला थेट ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 5:23 PM

Open in App

Sachin Tendulkar: क्रिकेटचा देव म्हणजेच मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे जगभरात चाहते आहेत. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २४ वर्षांची समृद्ध अशी कारकीर्द गाजवली. १०० आंतरराष्ट्रीय शतकं ठोकणारा तो एकमेव फलंदाज आहे. पण त्याला १००वे शतक झळकावताना खूप वाट पाहावी लागली. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या एका सामन्यात सचिन नव्वदीपार करून ९१ धावांवर खेळत होता, त्याच वेळी एका गोलंदाजाने त्याला बाद केलं आणि सचिनचं शतक हुकलं. त्यानंतर त्या गोलंदाजाला आणि सचिनला बाद ठरवणारे पंच रॉड टकर यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्या गोलंदाजाने आज स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. तो गोलंदाज म्हणजे टीम ब्रेसनन (Tim Bresnan). इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू टीम ब्रेसननने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच देशांतर्गत क्रिकेटलाही अलविदा केलं. इंग्लंडसाठी लकी चार्म मानल्या जाणार्‍या ब्रेसननने सोमवारी निवृत्ती जाहीर केली.

 

सचिनला टीम ब्रेसननने ९१ धावांवर बाद केलं तो क्षण

निवृत्तीची घोषणा करताना ३६ वर्षीय ब्रेसनन म्हणाला की, हा निर्णय घेणं सर्वात कठीण होतं पण क्रिकेट सोडण्याची हीच योग्य वेळ आहे. संपूर्ण कारकिर्दीत मी कठोर परिश्रम केले. निवृत्तीनंतरही क्रिकेटबद्दलचं प्रेम आणि तळमळ मनात कायम राहील, असं या खेळाडूने सांगितले. मी नव्या हंगामात सरावाला उतरलो होतो पण मला ते शक्य झालं नाही. तेव्हा मला समजलं की हा योग्य निर्णय आहे. वॉरविकशायर, यॉर्कशायर आणि इंग्लंडच्या संघाचे प्रतिनिधित्व करणं हा माझ्यासाठी खरोखरच मोठा सन्मान होता, अशा भावना टीम ब्रेसननने व्यक्त केल्या.

टीम ब्रेसननने इंग्लंडकडून २३ कसोटी, ८५ एकदिवसीय आणि ३४ टी२० सामने खेळले. त्याच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने ४ अर्धशतके झळकावली. ब्रेसननने एकदिवसीय सामन्यात १०९, कसोटीत ७२ तर टी२० मध्ये २४ बळी मिळवले. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्येही त्याची कामगिरी उत्तम होती. ब्रेसननने प्रथम श्रेणीमध्ये ५७५ गडी बाद केले. फलंदाजीतही ब्रेसननने ७ हजार १२८ प्रथम श्रेणी धावा केल्या. आणि लिस्ट ए मध्ये ब्रेसननने ३ हजार २४० धावा केल्या तर टी२० मध्ये त्याने १ हजार ७४८ धावा केल्या.

टॅग्स :सचिन तेंडुलकरइंग्लंड
Open in App