England Men squad for India Test tour announced - इंग्लंडचा संघ पुढील वर्षी ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडने आज १६ सदस्यीय तगडा संघ जाहीर केला आहे. या संघामध्ये जलदगती गोलंदाज गुस एटकिन्सन, फिरकीपटू टॉम हार्टली व शोएब बशीर या अनकॅप्ड खेळाडूंना संधी दिली गेली आहे.
एटकिन्सनने मागील समरमधअये कौंटी चॅम्पियनशीपच्या ५ सामन्यांत २० विकेट्स घेतल्या होत्या आणि या कामगिरीच्या जोरावर सरे क्लबने सलग दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरले होते. हार्टली व बशीर हे मागील महिन्यात यूएई येथे इंग्लंडच्या संघाकडून सरावासाठी गेले होते. तिथे त्यांनी कसोटी संघाचा उप कर्णधार ओली पोप व जॅक लीच यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. रेहान अहमद याचेही कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. मागील डिसेंबर महिन्यात पाकिस्तानविरुद्ध पदार्पणात त्याने पाच विकेट्स घेतल्या होत्या.
भारत-इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक
- पहिली कसोटी - २५ ते २९ जानेवारी, हैदराबाद
- दुसरी कसोटी - २ ते ६ फेब्रुवारी, व्हायझॅक
- तिसरी कसोटी - १५ ते १९ फेब्रुवारी, राजकोट
- चौथी कसोटी - २३ ते २७ फेब्रुवारी, रांची
- पाचवी कसोटी - ७ ते ११ मार्च, धर्मशाला
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील ही मालिका असल्याने दोन्ही संघ गुण मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील. भारतीय संघ सध्या १६ गुण व ६६.६७ टक्केवारीसह तालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंड ९ गुण व १५ टक्क्यांसह सातव्या क्रमांकावर आहे. भारताने दोन वेळा WTC च्या फायनलमध्ये धडक मारली आहे, पंरतु त्यांना अनुक्रमे न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली आहे.