Join us

पुन्हा तीच चूक... इंग्लंडने तिसऱ्या T20 साठी जाहीर केली 'प्लेइंग ११'; पण महत्त्वाची गोष्टच विसरले!

England Playing XI against Team India, Ind vs Eng 3rd T20 : भारत-इंग्लंड टी२० मालिकेतील तिसरा सामना उद्या राजकोटमध्ये रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 17:05 IST

Open in App

England Playing XI against Team India, Ind vs Eng 3rd T20 : भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या सुरू असलेल्या T20I मालिकेत दोन सामने खेळले गेले आहेत. भारतीय संघाने हे दोन्ही जिंकून २-० अशी आघाडी घेतली आहे. तिलक वर्माच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धची दुसरी टी२० जिंकली. प्रथम फलंदाजी करताना जोश बटलरच्या ४५ धावांच्या मदतीने इंग्लंडने ९ बाद १६५ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून तिलक वर्माने अखेरपर्यंत झुंज देत नाबाद ७२ धावांची खेळी केली. आता २८ जानेवारीला तिसरी टी२० खेळवण्यात येणार असून त्यासाठी इंग्लंडने संघ जाहीर केला आहे.

पराभव झाल्यानंतरही संघात बदल नाही

इंग्लंड संघाने सोमवारी आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली. दुसऱ्या सामन्यात सहभागी झालेले सर्व खेळाडू तिसऱ्या सामन्यातही खेळणार आहेत. म्हणजेच यात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या सामन्यात खेळाडूंची कामगिरी फारशी चांगली नव्हती. चेन्नईत झालेल्या सामन्यात कर्णधार जोस बटलर आणि ब्रेडन कार्स यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला फारशी चमक दाखवता आली नाही. सलामीवीर फिल सॉल्ट आणि बेन डकेटसह हॅरी ब्रूक आणि लियम लिव्हिंगस्टनही पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत. तरीही संघात बदल करण्यात आलेला नाही.

संघ निवडताना केली तीच चूक

एकीकडे भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पहिल्या सामन्यात ३ तर दुसऱ्या सामन्यात ४ फिरकी गोलंदाजांचा वापर केला होता. दुसरीकडे, बटलरने या दोन सामन्यांमध्ये केवळ २ फिरकीपटूंचा वापर केला आणि केवळ ९ षटके दिली. राजकोट येथे होणाऱ्या सामन्यात खेळ जसजसा पुढे जाईल तसतसे फिरकीपटूंना मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र तिसऱ्या सामन्यातही इंग्लंडचा संघ केवळ २ फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरणार आहे.

तिसऱ्या टी२०साठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन- बेन डकेट, फिल सॉल्ट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियम लिव्हिंगस्टन, जेमी स्मिथ, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, मार्क वूड आणि आदिल रशीद

टॅग्स :भारत विरूद्ध इंग्लंड २०२५इंग्लंडभारतीय क्रिकेट संघसूर्यकुमार अशोक यादवजोस बटलर