लंडन : गेल्या लढतीत श्रीलंकेविरुद्ध पराभव स्वीकारणारा इंग्लंड संघ आपल्या चुकांपासून बोध घेत परंपरागत प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मंगळवारी साखळी फेरीत खेळणार आहे. या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना रंगतदार खेळ अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्डस्वर खेळली जाणारी ही लढत विशेष होईल. पण गेल्या लढतती इंग्लंडला २० धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यामुळे या लढतीची रंगत आणखी वाढली आहे. हेडिंग्लेमध्ये विजयासाठी २३३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव २१२ धावांत संपुष्टात आला.
साखळी फेरीत त्यांना पाकिस्तानविरुद्धही पराभव स्वीकारावा लागला, पण यजमान संघ अव्वल चारमध्ये कायम असून उपांत्य फेरी गाठण्याचा प्रबळ दावेदार आहे. प्रथमच विश्वचषक जिंकण्याच्या प्रयत्नात असलेल्या इंग्लंड संघासाठी आता पराभव महागडा ठरू शकतो. त्यांना आगामी लढतींमध्ये आॅस्ट्रेलियानंतर भारत आणि न्यूझीलंड या दिग्गज संघांविरुद्ध खेळायचे आहे. इंग्लंडला या संघांना १९९२ नंतर विश्वचषक स्पर्धेत पराभूत करता आलेले नाही.
गेल्या विश्वचषक स्पर्धेत पहिल्या फेरीत गाशा गुंडाळावा लागल्यानंतर इंग्लंड संघाने जागतिक क्रमवारीत आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर अव्वल स्थान गाठले. त्यांनी या चार वर्षांत दोनदा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. केवळ वर्षभरापूर्वीच त्यांनी आॅस्ट्रेलियाविरुद्ध ६ बाद ४८१ धावांची मजल मारली होती. श्रीलंकेविरुद्ध फलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर मात्र इंग्लंडच्या फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.
क्रिकेट आकडेवारीनुसार इंग्लंडने चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ फेरीत पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाल्यानंतर ज्या सर्वांत खडतर एकदिवसीय खेळपट्ट्यांवर सामने खेळले त्यात पाच सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. दुसºया बाजूचा विचार करता फलंदाजीला अनुकूल खेळपट्ट्यांवर त्यांनी ११ पैकी ९ सामने जिंकले आहेत. गेल्या दोन सामन्यांत फिटनेस समस्येमुळे संघाबाहेर असलेल्या जेसन रॉयची इंग्लंड संघाला मोठी उणीव भासत आहे.
दुसरीकडे, आॅस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच व डेव्हिड वॉर्नर शानदार फॉर्मात आहे. गुणतालिकेत आॅस्ट्रेलिया दुसºया स्थानी आहे. मिशेल स्टार्कने स्पर्धेत जोफ्रा आर्चर (इंग्लंड) आणि मोहम्मद आमिर (पाकिस्तान) यांच्याप्रमाणे १५ बळी घेतले आहेत. आॅस्ट्रेलियाचा विश्वचषक विजेता माजी कर्णधार अॅलेन बॉर्डरच्या मते या लढतीचा निकाल गोलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून राहील. (वृत्तसंस्था)
हेड-टू-हेड
दोन्ही संघांदरम्यान सन १९७१ पासून आतापर्यंत १४७ आंतरराष्टÑीय एकदिवसीय सामने झाले असून, त्यापैकी आॅस्ट्रेलियाने ८१ सामने, तर इंग्लंडने ६१ सामने जिंकले आहेत. याशिवाय दोन सामने टाय झाले असून, तीन सामने अनिर्णित राहिले आहेत.
दोन्ही संघांमधील शेवटच्या पाच लढतींमधील सर्व सामने इंग्लंडने जिंकले आहेत.
दोन्ही संघ विश्वचषकामध्ये
१९७५ पासून आतापर्यंत ७ वेळा आमनेसामने आले असून, यामध्ये पाचवेळा आॅस्ट्रेलियाने, तर दोनवेळा इंग्लंडने बाजी मारली आहे.
विश्वचषकामध्ये आॅस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध ३४२, तर इंग्लंडने आॅस्ट्रेलियाविरुद्ध २४७ धावा अशी सर्वाेच्च धावसंख्या उभारली आहे.
आॅस्ट्रेलियाची इंग्लंडविरुद्ध ९४ धावांची नीचांकी खेळी असून इंग्लंडची नीचांकी धावसंख्या ९३ आहे.
Web Title: England are keen to return to the winning track, today they are fighting against traditional rival Aussie
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.