नॉटिंगहॅम : धडाकेबाज सूर्यकुमार यादवच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-२० शतकानंतरही भारताला तिसऱ्या टी-२० सामन्यात यजमान इंग्लंडकडून १७ धावांनी पराभव पत्करावा लागला. पहिले दोन सामने जिंकून भारतीयांनी मालिकेत विजयी आघाडी घेतली होती. त्याचवेळी, इंग्लंडने तिसरा सामना जिंकून व्हाइट वॉशची नामुष्की टाळली.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २० षटकांमध्ये ७ बाद २१५ धावा उभारल्या. भारताने २० षटकांत ९ बाद १९८ धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना भारताने जवळपास सामना खेचलाच होता. मात्र १९ व्या षटकात शतकवीर सूर्यकुमार बाद झाला आणि सामना इंग्लंडच्या बाजूने झुकला. सूर्यकुमारने एकट्याने झुंज देताना ५५ चेंडूंत १४ चौकार व ६ षटकारांसह ११७ धावा कुटल्या. त्याला बऱ्यापैकी साथ दिलेल्या श्रेयस अय्यरने २३ चेंडूंत २८ धावांची संथ खेळी केली.
दोघांनी चौथ्या गड्यासाठी ११९ धावांची विक्रमी भागीदारी करीत भारताला विजयी मार्गावर ठेवले होते. १६ व्या षटकात रीस टॉप्लेने अय्यरला बाद केल्यानंतर इंग्लंडने सामन्यात पुनरागमन केले. रोहित शर्मा (११), ऋषभ पंत (१), विराट कोहली (११) हे आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर सूर्याने एकाकी लढा दिला. टॉप्लेने २२ धावांत ३ बळी घेतले. त्याआधी, यजमान इंग्लंडने डेविड मलानच्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर आव्हानात्मक मजल मारली.
- चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत आंतरराष्ट्रीय टी-२० शतक ठोकणारा सूर्यकुमार यादव हा लोकेश राहुलनंतरचा दुसरा भारतीय ठरला.
- आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये शतक ठोकणारा सूर्यकुमार हा पाचवा भारतीय ठरला.
- धावांचा पाठलाग करताना आंतरराष्ट्रीय टी-२० शतक ठोकणारा सूर्यकुमार हा तिसरा भारतीय ठरला. रोहित शर्माने एकदा, तर लोकेश राहुलने दोन वेळा असा पराक्रम केला आहे.
- सूर्यकुमार आणि श्रेयस अय्यर यांनी आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये चौथ्या गड्यासाठी भारताकडून सर्वाधिक ११९ धावांची भागीदारी करताना लोकेश राहुल-महेंद्रसिंग धोनी (१०७) यांचा विक्रम मोडला.
- धावफलक
धावफलक इंग्लंड : जेसन रॉय झे. पंत गो. मलिक २७, जोस बटलर त्रि. गो. आवेश १८, डेव्हिड मलान झे. पंत गो. बिश्नोई ७७, फिल सॉल्ट त्रि. गो. हर्षल ८, लियाम लिव्हिंगस्टोन नाबाद ४२, मोईन अली झे. हर्षल गो. बिश्नोई ०, हॅरी ब्रूक झे. बिश्नोई गो. हर्षल १९, ख्रिस जॉर्डन धावबाद (जडेजा-पंत) ११. अवांतर : १३. एकूण : २० षटकांत ७ बाद २१५ धावा.
बाद क्रम : १-३१, २-६१, ३-८४, ४-१६८, ५-१६९, ६-१९७, ७-२१५.
गोलंदाजी : आवेश खान ४-०-४३-१; उमरान मलिक ४-०-५६-१; रवी बिश्नोई ४-०-३०-२; रवींद्र जडेजा ४-०-४५-०; हर्षल पटेल ४-०-३५-२.
भारत : रोहित शर्मा झे. सॉल्ट गो. टॉप्ले ११, ऋषभ पंत झे. बटलर गो. टॉप्ले १, विराट कोहली झे. रॉय गो. विले ११, सूर्यकुमार यादव झे. सॉल्ट गो. मोइन ११७, श्रेयस अय्यर झे. बटलर गो. टॉप्ले २८, दिनेश कार्तिक पायचीत गो. विले ६, रवींद्र जडेजा पायचीत गो. ग्लीसन ७, हर्षल पटेल झे. ग्लीसन गो. जॉर्डन ५, आवेश खान नाबाद १, रवी बिश्नोई त्रि. गो. जॉर्डन २. अवांतर : ९. एकूण : २० षटकांत ९ बाद १९८ धावा.
बाद क्रम : १-२, २-१३, ३-३१, ४-१५०, ५-१६६, ६-१७३, ७-१९१, ८-१९६, ९-१९८.
गोलंदाजी : डेव्हिड विले ४-०-४०-२; रीस टॉप्ले ४-०-२२-३; रिचर्ड ग्लीसन ४-०-३१-१; ख्रिस जॉर्डन ४-०-३७-२; लियाम लिव्हिंगस्टोन २-०-३६-०; मोइन अली २-०-३१-१.