England opener Jason Roy fined, handed two-match ban by ECB - इंग्लंडचा स्फोटक ओपनर जेसन रॉय याच्यावर इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने ( ECB) दोन सामन्यांच्या बंदीचा कारवाई केली आहे. आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्स ( Gujarat Titans) संघाने त्याला आपल्या ताफ्यात घेतले होते, परंतु बायो बबलच्या थकव्यामुळे त्याने मघार घेतली. ECBने दोन सामन्यांच्या बंदीसह त्याच्यावर २ ,५०० यूरो म्हणजेच जवळपास अडीच लाखांचा दंडही ठोठावला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मंगळवारी निवेदन जाहीर केले आणि वाईट वर्तवणुकीमुळे जेसन रॉयवर ही कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रॉयची वर्तवणूक न सुधारल्यास त्याच्यावरील ही बंदी १२ महिन्यांपर्यंत कायम राहू शकते, याचा अर्थ तो ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेलाही मुकू शकतो.
ECBने म्हटले की,''क्रिकेट शिस्तपालन समितीच्या पॅनलने जेसन रॉयविरुद्धी त्यांना निर्णय जाहीर केला. जेसननेही त्याच्यावरील आरोप मान्य केले आहेत. त्याच्या वागण्याने ECB व त्याची स्वतःची बदनामी होत आहे. जेसनने ECBच्या ३.३ कलमांचे उल्लंघन केले आहे. जेसन आता पुढील दोन आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकणार नाही. तो निवडीसाठी उपलब्ध असेल परंतु १२ महिन्यांपर्यंत हे निलंबन असू शकते. ही शिक्षा त्याच्या वर्तवणूकीवर अवलंबून आहे. त्याला ३१ मार्चपर्यंत दंडात्मक रक्कम भरावी लागेल.''
जेसन रॉयची IPL 2022तून माघार...नुकत्याच झालेल्या लिलावात गुजरात टायटन्स संघाने जेसन रॉयला दोन कोटीच्या मूळ किमतीत त्याला संघात घेतले होते. युवा शुभमान गिल याच्यासोबत सलामीचा सहकारी म्हणून गुजरातने त्याची निवड केली होती. आयपीएलमधून रॉयने माघार घेण्याची ही दुसरी वेळ आहे. २०२० मध्ये दिल्ली संघाने त्याला दीड कोटी रुपयात संघात घेतले होते. आयपीएलचे १५ वे पर्व २६ मार्चपासून सुरू होत आहे. मागच्या पर्वात रॉय सनरायजर्स हैदराबादकडून खेळला होता. यंदा तो पाकिस्तान सुपर लीगमध्येही क्वेटा ग्लॅडिएटर्स संघासाठी खेळला होता.
आज जड अंत:करणाने मला हे सांगावे लागते आहे की यावर्षीच्या आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी गुजरातच्या संघ व्यवस्थापनाचे आणि कर्णधार हार्दिकचे आभार मानू इच्छितो की त्यांनी लिलावाच्या वेळी माझ्यावर विश्वास दाखवून मला संघात निवडले होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून जगभरात जे सुरू आहे त्यामुळे कुठेतरी माझ्यावर त्याचा ताण आला आहे. त्यामुळेच मला सध्या माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे तसेच वर्षभरातल्या व्यस्त वेळापत्रकापूर्वी मला स्वत:साठी आणि खेळ सुधारण्यासाठी काही वेळ हवा होता. मी आयपीएल खेळणार नसलो तरी मी गुजरातचा प्रत्येक सामना बघणार आहे आणि त्यांना विजेतेपदासाठी पाठिंबा देणार आहे. मला नेहमीच पाठिंबा देणाऱ्या आणि माझ्या या निर्णयात माझ्यासोबत असणाऱ्या प्रत्येकाचा मी मनापासून आभारी आहे.