लंडन : ‘सत्य दडवू नये’ आमचे फलंदाज भारतातील फिरकीला पोषक खेळपट्ट्यांवर खेळण्याच्या लायकीचे नाहीत. खेळपट्टी, चेंडू आणि अन्य गोष्टींना दोष देणे सोपे आहे. मात्र, पहिल्या डावात धावा काढण्याचे तंत्र मात्र जमलेले नाही. दीर्घकाळ खेळपट्टीवर स्थिरावण्याचे तंत्र तुम्हाला शोधावेच लागेल,’ या शब्दांत इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉस याने सध्याच्या इंग्लिश फलंदाजांबाबत निराशा जाहीर केली.
अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या चौथ्या कसोटीत इंग्लंड २०५ धावांत बाद झाला. अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन या फिरकी जोडीने फलंदाजांना स्थिरावू दिले नाही. यावर मत मांडताना ‘चॅनल फोरशी’ बोलताना स्ट्रॉस म्हणाला, ‘इंग्लंड संघ मानसिक युद्धात पराभूत झाला. सुरुवातीच्या दोन सामन्यांत केलेली चूक ते वारंवार करीत आहेत. मालिकेत अशीच चूक होत असेल तर फलंदाज यशस्वी होणार नाहीत. जो चेंडू वळण घेत नाही तो चेंडूदेखील आमच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी का ठरतो? खेळण्याचे तंत्र विसरलो की काय, असे वाटू लागले आहे.’
हुसेनचा संघ निवडीवर आक्षेप
इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसने याने चौथ्या कसोटीसाठी निवडलेल्या संघावर आक्षेप घेतला. ‘आमचा संघ पाचव्यांदा धावा काढण्यात अपयशी ठरला. येथे २०५ पर्यंत मजल गाठण्याचे श्रेय अँडरसनला जाते. पहिल्या दिवसापासून चेंडू वळण घेईल, या आशेपोटी दोन वेगवान गोलंदाजांना बाकावर बसविले. झाले मात्र उलटेच. सिराज आणि ईशांत यांना सकाळच्या सत्रात यश आले. या सामन्यासाठी इंग्लंड संघात तीन वेगवान गोलंदाज आणि एक अतिरिक्त फिरकीपटू हवा होता,’ असे हुसेनने म्हटले आहे.