मेलबर्न : सलामीवीर फलंदाज जेसन रॉय याने इंग्लंडकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करताना नवीन विक्रम रचला. त्याच्या विक्रमी खेळीच्या बळावर इंग्लंडने आज येथे पहिल्या वनडे सामन्यात आॅस्ट्रेलियावर ५ गडी राखून मात केली.
अॅशेज मालिकेत 0-४ ने सफाया झालेल्या इंग्लंडसमोर आॅस्ट्रेलियाने वनडेत कठीण लक्ष्य ठेवले होते; परंतु रॉय याच्या १८0 धावांच्या सुरेख खेळीच्या बळावर इंग्लंडने विजयी लक्ष्य सात चेंडू बाकी असताना गाठले. जो रुट याने नाबाद ९१ धावा केल्या. जेसन रॉय व जो रुट या दोघांनी तिसºया गड्यासाठी २२१ धावांची भागीदारी केली. ही इंग्लंडतर्फे विक्रमी भागीदारी ठरली. इंग्लंडसमोर विजयासाठी ३0५ धावांचे कठीण आव्हान होते आणि रॉय याच्या धडाकेबाज खेळीच्या बळावर त्यांनी ५ बाद ३0८ धावा करीत विजयी लक्ष्य गाठले. विशेष म्हणजे मेलबर्न क्रिकेट मैदानावर सर्वात मोठे लक्ष्य गाठण्याचादेखील इंग्लंडने विक्रम नोंदवला आहे.
याआधीचा मोठे विजयी लक्ष्य गाठण्याचा विक्रम आॅस्ट्रेलियाच्या नावावर होता. याआधी आॅस्ट्रेलियाने २0११ मध्ये इंग्लंडविरुद्ध ४ बाद २९७ धावा केल्या होत्या.
रॉय याने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा अवलंबताना अवघ्या ३२ चेंडूंतच अर्धशतक पूर्ण केले. ९१ धावांवर असताना त्याच्याविरुद्धच्या पायचीतसाठी रिव्ह्यू घेण्यात आला, जो की त्याच्या बाजूने गेला. रॉय याने ९२ चेंडूंत ९ चौकार आणि ३ षटकारांसह त्याचे शतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने त्याचा सहकारी अॅलेक्स हेल्स याचा २0१६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध इंग्लंडकडून सर्वोत्तम केलेल्या १७१ धावांचा विक्रम मोडला. त्याला अखेर मिशेल स्टार्कने बाद केले. रॉय याने १५१ चेंडूंत १६ चौकार आणि ५ षटकार मारले.
रॉय याने आपल्या धडाकेबाज खेळीने अॅरोन फिंच (१0७) याची शतकी खेळीदेखील फिकी केली. फिंचची शानदार खेळी आणि मिशेल मार्श (५0) व मार्कस् स्टोइनिस (६0) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर आॅसीने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ३0४ धावा केल्या होत्या.
Web Title: England beat Australia by 5 wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.