Join us  

ENG vs BAN : बांगलादेशचा दारूण पराभव; गतविजेत्यांनी विजयाचं खातं उघडलं, नेट रनरेटमध्ये 'भाव' वाढला

ICC ODI world cup 2023 : बांगलादेशचा १३७ धावांनी दारूण पराभव करून गतविजेत्या इंग्लंडने चालू विश्वचषकात विजयाचे खाते उघडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 6:49 PM

Open in App

ENG vs BAN : बांगलादेशचा १३७ धावांनी दारूण पराभव करून गतविजेत्या इंग्लंडने चालू विश्वचषकात विजयाचे खाते उघडले. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने धावांचा डोंगर उभारला. ३६५ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला घाम फुटला. लिटन दास (७६) आणि मुशफिकुर रहिम (५१) वगळता एकाही बांगलादेशी खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. अखेर ४८.२ षटकांत २२७ धावांवर शाकीब अल हसनचा संघ सर्वबाद झाला अन् इंग्लिश संघाने मोठा विजय मिळवला. रीस टॉप्लेने सर्वाधिक ४ बळी घेऊन बांगलादेशच्या फलंदाजीची कंबर मोडीत काढली. त्याच्याशिवाय ख्रिस वोक्सला २ बळी घेण्यात यश आले. 

तत्पुर्वी, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडकडून डेव्हिड मलानने सर्वाधिक १४० धावांची खेळी केली, तर जॉनी बेअरस्टो (५२) आणि जो रूटला (८२) धावा करण्यात यश आले. बांगलादेशकडून महेदी हसनने सर्वाधिक चार बळी घेऊन इंग्लिश संघाला कसेबसे ३६४ धावांपर्यंत रोखले. याशिवाय शोरफुल इस्लाम (३) आणि तस्कीन अहमद आणि शाकीब अल हसन यांना १-१ बळी घेता आला. अखेर इंग्लंडला ३६४ धावांवर रोखण्यात बांगलादेशला यश आले. गतविजेत्या इंग्लंडच्या संघाला सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे बांगलादेशविरूद्धचा सामना इंग्लिश संघासाठी महत्त्वाचा होता. डेव्हिड मलानने स्फोटक सुरूवात करून दिल्यानंतर सर्वच इंग्लिश फलंदाजांनी हात साफ केले अन् बांगलादेशसमोर धावांचा डोंगर उभारला आणि मोठा विजय साकारला. 

 मलानचे विक्रमी शतकदरम्यान, सलामीवीर डेव्हिड मलानने विक्रमी शतक झळकावत भारतीय भूमीवर इतिहास रचला. खरं तर भारतातील विश्वचषकात शतक झळकावणारा तो तिसरा इंग्लिश खेळाडू ठरला आहे. बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यात धर्मशाला येथे सामना खेळवला गेला. डेव्हिड मलानने आपल्या वन डे कारकिर्दीतील सहावे शतक झळकावून बांगलादेशसमोर तगडे आव्हान उभारले. त्याने १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ९१ चेंडूत शतक पूर्ण केले. तसेच चालू विश्वचषकात इंग्लिश संघाकडून शतक झळकावणारा तो पहिला शिलेदार ठरला आहे. सलामीच्या सामन्यातील पराभवानंतर इंग्लंडचा नेट रनरेट (-२.१४९) खूप ढासळला होता. पण, आजच्या मोठ्या विजयाने गतविजेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण नेट रनरेटमध्ये कमालीची वाढ झाली असून तो +०.५५३ वर जाऊन पोहचला आहे. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपइंग्लंडबांगलादेश