गुवाहाटी : इंग्लंडने तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील सोमवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाचा ४१ धावांनी पराभव केला. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली प्रथमच मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला विजयासाठी १६१ धावांचे लक्ष्य मिळाले होते, पण संघाला २० षटकांत ६ बाद ११९ धावा करता आल्या.इंग्लंडतर्फे सलामीवार फलंदाज टॅमी ब्युमोंटने ५७ चेंडूंना सामोरे जाताना सर्वाधिक ६२ धावा केल्या, तर कर्णधार हीथर नाईटने २० चेंडूंमध्ये ४० धावांची आक्रमक खेळी केली. इंग्लंडने २० षटकांत ४ बाद १६० धावांची मजल मारली.ब्युमोंट व डॅनियल वॅट (३४ चेंडूंमध्ये ३५ धावा) या सलामीवीरांनी ८९ धावांची भागीदारी करीत इंग्लंडला चांगली सुरुवात करून दिली. कर्णधार नाईटने अखेरच्या षटकांमध्ये २० चेंडूंमध्ये ७ चौकार लगावले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. फॉर्मात असलेल्या मानधनासह आघाडीच्या तीन फलंदाज २३ धावांत माघारी परतल्या होत्या. सीनिअर खेळाडू मिताली राज (११ चेंडू, ७ धावा) आणि पुनरागमन करणारी वेदा कृष्णमूर्ती (१५) यांची कामगिरीही निराशाजनक ठरली. अखेर दीप्ती (नाबाद २२), अरुंधती रेड्डी (१८) व शिखा पांड्ये (नाबाद २३) यांनी काही चांगले फटके लगावले, पण संघाला विजय मिळवून देण्यास ते पुरेसे नव्हते.भारतीय संघाचा टी२० क्रिकेटमधील सलग पाचवा पराभव आहे. प्रशिक्षक डब्ल्यू.व्ही. रमण यांना पुढील वर्षी आॅस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेपूर्वी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. यापूर्वी न्यूझीलंड दौऱ्यात एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाला तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत एकही सामना जिंकता आला नाही. (वृत्तसंस्था)>टी२० मध्ये भारतातर्फे सर्वांत कमी वयात कर्णधारपद भूषविणारी २२ वर्षीय मानधना सामन्यानंतर म्हणाली की, ‘अंतिम षटकांमध्ये भारताला अचूक मारा करावा लागेल. आम्ही अखेरच्या षटकांमध्ये १०-१५ धावा अधिक दिल्या. फलंदाजीमध्येही आम्हाला चांगली सुरुवात मिळाली नाही. अरुंधती रेड्डी, शिखा पांडे व दीप्ती शर्मा यांची फलंदाजी आमच्यासाठी सकारात्मक बाब आहे.’>संक्षिप्त धावफलक : इंग्लंड (महिला) : २० षटकात ४ बाद १६० धावा (टॅमी ब्युमोंट ६२, हीथर नाइट ४०, डॅनियल वॅट ३५; राधा यादव २/३३.) वि.वि. भारत (महिला) : २० षटकात ६ बाद ११९ धावा (शिखा पांड्ये नाबाद २३, दीप्ती शर्मा नाबाद २२, अरुंधती रेड्डी १८; कॅथरिन ब्रंट २/२१, लिन्सी स्मिथ २/२२.)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- इंग्लंडची भारतीय महिला संघावर ४१ धावांनी मात
इंग्लंडची भारतीय महिला संघावर ४१ धावांनी मात
इंग्लंडने तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील सोमवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाचा ४१ धावांनी पराभव केला.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 4:07 AM