नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर रंगलेल्या टी-२० विश्वचषकातून भारतीय संघ बाहेर झाला आहे. इंग्लंडविरूद्धच्या पराभवानंतर भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. ४ साखळी सामने जिंकून भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. मात्र उपांत्य फेरीत आज इंग्लिश संघाने भारताचा १० गडी राखून मोठा पराभव केला. भारताने दिलेल्या १६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग इंग्लिश संघाने केवळ १६ षटकांत पूर्ण केला. या विजयासह इंग्लिश संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. फायनलचा सामना १३ तारखेला पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे.
तत्पुर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताची सुरूवात निराशाजनक झाली. सलामीवीर लोकेश राहुल दुसऱ्याच षटकातील चौथ्या चेंडूवर स्वस्तात माघारी परतला. कर्णधार रोहित शर्मा देखील २८ चेंडूत २७ धावांची सावध खेळी करून तंबूत परतला. त्यानंतर संघाची धुरा विराट कोहलीने सांभाळली आणि शानदार अर्धशतकी खेळी केली. भारताकडून किंग कोहली आणि हार्दिक पांड्या व्यतिरिक्त कोणत्याच फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. विराट कोहली ४० चेंडूत ५० धावांची खेळी करून बाद झाला. तर सूर्याला केवळ १० धावा करता आल्या. मात्र त्यानंतर हार्दिक पांड्याने ३३ चेंडूत ६३ धावांची ताबडतोब खेळी केली. पांड्याने ४ चौकार आणि ५ चौकारांच्या जोरावर इंग्लंडसमोर १६९ धावांचे सन्मानजनक आव्हान ठेवले. मात्र भारतीय गोलंदाजांना अपयश आले आणि इंग्लिश संघाने १० गडी राखून मोठा विजय मिळवून फायनलचे तिकिट मिळवले.
विराट कोहलीची एकतर्फी झुंज लक्षणीय बाब म्हणजे मागील ३ विश्वचषकात शानदार कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली आहे. विराट कोहली चालू विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. विराटने २०१४च्या विश्वचषकात ३१९ धावा केल्या होत्या मात्र तेव्हाही भारताला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. तर २०१६च्या विश्वचषकात कोहलीने २७३ धावा केल्या होत्या अन् तेव्हाही भारताला उपांत्य फेरीपर्यंतच समाधान मानावे लागले होते. विशेष बाब म्हणजे या विश्वचषकात शानदार खेळी करून देखील भारत विश्वचषकाचा किताब पटकावू शकला नाही. सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकात किंग कोहलीने ६ सामन्यात २९६ धावा केल्या आहेत. मात्र यंदा देखील कोहलीचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंग झाले.
भारताचा लाजिरवाणा पराभव २०२२च्या टी-२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताचा इंग्लंडकडून लाजिरवाणा पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ६ बाद १६८ धावा केल्या होत्या, ज्याचा पाठलाग करताना इंग्लिश संघाने १० गडी राखून सहज विजय मिळवला. भारताकडून विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी शानदार अर्धशतकी खेळी केली. मात्र भारतीय गोलंदाजांना एकही बळी पटकावता आला नाही. अखेर इंग्लिश संघाने १६ षटकांतच १६९ धावा करून फायनलमध्ये प्रवेश केला. इंग्लंडकडून सलामीवीर जोस बटलर आणि ८० तर ॲलेक्स हेल्स यांनी अनुक्रमे ८० आणि ८९ धावांची नाबाद खेळी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"