कार्डिफ, इंग्लंड वि. पाकिस्तान : 30 मे पासून सुरू होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या पाकिस्तान संघाला ट्वेंटी-20 सामन्यात हार पत्करावी लागली. पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी यजमान इंग्लंडविरुद्ध 1 ट्वेंटी-20 आणि पाच वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. मालिकेतील पहिल्या व एकमेव ट्वेंटी-20 सामन्यात पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन आणि जो रूट यांच्या दमदार खेळीच्या जोरावर इंग्लंडने हा सामना 7 विकेट राखून सहज जिंकला.सराव सामन्यात खोऱ्याने धावा करणाऱ्या पाकिस्तानचा फलंदाजांना इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर फार काही करिष्मा करता आला नाही. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या पाक संघाला 6 बाद 173 धावांपर्यंत मजल मारता आली. फखर जमान ( 7), इमाम उल-हक ( 7) यांच्याकडून फार अपेक्षा होत्या. बाबर आझम ( 65) आणि हॅरिस सोहेल ( 50) यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. इंग्लंडकडून ट्वेंटी-20त पदार्पण करणाऱ्या जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या.लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला तिसऱ्याच षटकात धक्का बसला. त्यांचा सलामीवीर बेन डकेट ( 9) शाहिन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. मात्र, त्यानंतर जेम्स व्हिंस आणि जो रूट यांनी इंग्लंडचा डाव सावरला. व्हिंस 27 चेंडूंत 36 ( 3 चौकार व 1 षटकार) धावा करून बाद झाला. रूट व कर्णधार मॉर्गन यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांना यश मिळवू दिले नाही. दोघांनी खेळपट्टीवर नांगर रोवला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली. हसन अलीनं 47 धावांवर रूटला माघारी पाठवले. मॉर्गनने सामन्याची सर्व सूत्र हाती घेत पाकिस्तानच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. पाच चेंडूत पाच धावांची आवश्यकता असताना मॉर्गनने खणखणीत षटकार खेचून इंग्लंडचा विजय पक्का केला. त्याने 29 चेंडूंत 5 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 57 धावा केल्या. जो डेन्लीने 12 चेंडूंत नाबाद 20 धावा केल्या.